Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात रंगणार ‘गळवंती’चा थरार; परंपरा आणि लोकसंस्कृतीचा उत्सव; राजा वीरभद्र महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी

राहाता : शहरातील राजा वीरभद्र महाराज यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून, शतकानुशतके जपलेली लोकसंस्कृतीची जिवंत परंपरा आहे. काळाच्या ओघात पिढ्या बद

उन्हाच्या झळांत पशुपक्ष्यांसाठी ‘जीवनदायी’ पाणवठा
रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू 
भोंदूगिरीला पाठबळ देणाऱ्या ३९ आमदारांचे राजीनामे घ्या;माकपची मागणी; ६ एप्रिलला राज्यभर आंदोलनाचा इशारा

राहाता : शहरातील राजा वीरभद्र महाराज यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून, शतकानुशतके जपलेली लोकसंस्कृतीची जिवंत परंपरा आहे. काळाच्या ओघात पिढ्या बदलल्या, तरीही गळवंती (बगाड) परंपरेची उर्जा आणि श्रद्धा आजही तितक्याच ताकदीने टिकून आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हसोबा मंदिरात नारळ फोडून यात्रेची सुरुवात होते. हनुमान जयंतीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात गावातील सर्व समाजघटक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. यंदा २ एप्रिल रोजी नवनाथ महाराज यात्रा, तर ३ एप्रिल रोजी राजा वीरभद्र महाराज यात्रा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष जाबाजी मेचे यांनी दिली.

या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘गळवंती लागणे’ ही परंपरा. नवसपूर्तीसाठी दरवर्षी हजारो महिला व पुरुष गळी लागतात. कोरोना कालावधीनंतर पुन्हा एकदा हा थरार अनुभवायला मिळणार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. राज्यभरातून भक्त मोठ्या संख्येने यात्रेला हजेरी लावतात.

यात्रेपूर्वी शहरात आठ दिवसांपासून मिष्टान्न भोजन देण्याची प्रथा असून, यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत यांच्या होइक (भाकित) ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. मंदिरासमोर शेरणी (गुळ) व पेढ्यांचा प्रसाद वाटून नवसपूर्ती केली जाते.

गळवंती रथ हे यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सुमारे २४ फूट उंचीचा हा भव्य रथ पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने, लोखंडाचा वापर न करता सागवान व रामकाठी लाकडापासून तयार केला जातो. दोर व पारंपरिक तंत्राच्या साहाय्याने उभारलेला हा रथ गावातील कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे.

गळवंती मिरवणुकीदरम्यान डफांच्या गजरात आणि मानाच्या काठ्यांसह रथ शहरभर फिरतो. भाविक गळी लागून नवस व्यक्त करतात, जो श्रद्धेचा भावनिक संवाद मानला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी गळवंती प्रथम नवनाथ महाराज मंदिरात येते, तर दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला राजा वीरभद्र महाराज मंदिरात प्रस्थान करते. या प्रवासात संपूर्ण गाव सहभागी होत असल्याने वातावरण भक्तिमय होते.

या यात्रेत विविध समाजघटकांना मानाचे स्थान दिले जाते. रथ बनविण्याची परंपरा गाडेकर कुटुंबाकडे असून, गळवंती खेचण्याचा मान पारंपरिक समाजघटकांकडे आहे. सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मान जपणारी ही परंपरा आजही तितक्याच अभिमानाने पुढे चालू असल्याचे चित्र राहात्यात पाहायला मिळत आहे.   

आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात विद्युत रोषणाई, शोभेची दारू, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यती, लोककलावंतांचे कार्यक्रम आणि अखेरीस कीर्तन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रत्येक कार्यक्रम हा ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. – साहेबराव निधाने, माजी अध्यक्ष, वीरभद्र देवालय ट्रस्ट.

आजच्या पिढीने केवळ हा उत्सव पाहण्यापुरता मर्यादित न राहता, त्यामागील संस्कृती, इतिहास आणि श्रद्धा जपण्याची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. कारण गळवंती म्हणजे केवळ रथ नाही ती आहे शतकानुशतके जपलेली श्रद्धा, गावाची ओळख आणि संस्कृतीचा अभिमान.

विजय सदाफळ, उपाध्यक्ष, वीरभद्र देवालये ट्रस्ट

COMMENTS