अमरावती : आंध्रप्रदेशातील मार्कापुरमजवळील रायवरम परिसरात गुरुवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. खासगी प्रवासी बस आणि गिट्टी वा

अमरावती : आंध्रप्रदेशातील मार्कापुरमजवळील रायवरम परिसरात गुरुवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. खासगी प्रवासी बस आणि गिट्टी वाहतूक करणार्या टिप्पर वाहनाची समोरासमोर धडक होऊन बसला लागलेल्या भीषण आगीत किमान 14 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वेगाने धावणार्या बसने पुढील टिप्परला जोरदार धडक दिल्यानंतर क्षणार्धात बसला आग लागली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव पथकाने जखमींना बाहेर काढून तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, ही बस तेलंगणातील जगतियाल येथून प्रकाशम जिल्ह्यातील पोडिलीच्या दिशेने निघाली होती. अपघातावेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. काही मृतदेह आगीत पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण जात आहे. अद्याप काही मृतदेह बसमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. ओळख निश्चित होताच संबंधित कुटुंबीयांना माहिती देण्यात येणार आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमींना तत्काळ आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहतुकीतील नियमांचे काटेकोर पालन आणि वाहनांच्या सुरक्षिततेची तपासणी अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

COMMENTS