Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का : पंतप्रधान मोदी; दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे, देशाच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्याचे दूरगामी परिणाम जाणवतील, अशी चिं

इराण संघर्षामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने : पंतप्रधान मोदी
दूध भेसळ करणार्‍यांना चाप !
चार हजार एकर जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह; खा. लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; व्यवहाराच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्याचे दूरगामी परिणाम जाणवतील, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत व्यक्त केली. देशाच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत भारत विविध स्रोतांमधून कच्चे तेल आणि वायू मिळवण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. भारतासाठीही ही परिस्थिती चिंताजनक असून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांसारख्या अत्यावश्यक घटकांच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे. तसेच जागतिक व्यापारी मार्गांवर ताण वाढला असून होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. संघर्ष सुरू झाल्यापासून तीन लाख पंच्याहत्तर हजारांहून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात यश आले आहे. इराणमधूनही हजाराहून अधिक भारतीय, विशेषतः विद्यार्थी, परतले आहेत. काही ठिकाणी भारतीय नागरिकांच्या मृत्यू व जखमी होण्याच्या घटना घडल्याची माहिती असून संबंधित कुटुंबांना मदत केली जात आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्न हाच मार्ग असल्याचे भारताचे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पश्‍चिम आशियाई देशांच्या नेत्यांशी चर्चा सुरू असून भारत इराण, इस्रायल, अमेरिका आणि इतर देशांशी सातत्याने संपर्कात आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याचे सांगत भारताने त्याचा निषेधही नोंदवला आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने देशाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी नमूद केले की, पूर्वी 27 देशांकडून ऊर्जा आयात केली जात होती, ती आता 41 देशांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सामरिक पेट्रोलियम साठ्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून त्यांचा विस्तार सुरू आहे. विविध स्रोतांचा वापर वाढवून कोणत्याही एका इंधनावर अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


उत्पादन वाढवण्यासह आत्मनिर्भरतेवर भर
देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देतानाच घरगुती गॅससह पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठ्यालाही चालना दिली जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच आत्मनिर्भरतेवर भर देत स्वदेशी जहाजबांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची योजना हाती घेण्यात आली आहे. या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आयात-निर्यात, पुरवठा साखळी आणि महागाईवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने आंतर-मंत्रालयीन यंत्रणा सक्रिय केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तातडीने निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र सशक्त गटही स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS