Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसींसाठी कृतीशील लढा हीच शब्बीर भाईंना श्रध्दांजली!

 ओबीसी चळवळीचा एक जिद्दी, लढवय्या आणि निस्वार्थी चेहरा हरपला! शब्बीर भाई अन्सारी यांचे जालना येथे निधन झाले, ही बातमी मनाला खोलवर भिडणारी आहे. सम

आयसीएच‌आर ने ऐतिहासिक चूक करू नये ! 
भाजपचे ओबीसीमय राजकारण !
डॉ. हरी नरके : अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळतो !

 ओबीसी चळवळीचा एक जिद्दी, लढवय्या आणि निस्वार्थी चेहरा हरपला! शब्बीर भाई अन्सारी यांचे जालना येथे निधन झाले, ही बातमी मनाला खोलवर भिडणारी आहे. समाजाच्या हक्कांसाठी झटणारा हा योद्धा आज आपल्या सोबत नाही, पण त्यांनी पेटवलेली मशाल प्रज्वलित आहे. काही माणसं अशी असतात की, त्यांच्या जाण्याने रिक्तता निर्माण होत नाही; तर, आपल्यातल्या रिक्तपणाची जाणीव तीव्र होते. शब्बीर भाई अन्सारी यांचं जाणं तसंच आहे. त्यांच्याबद्दल लिहिताना केवळ “लढवय्या कार्यकर्ते” असं म्हणणं सोपं आहे, पण ते अपुरं आहे. कारण ते केवळ रस्त्यावर घोषणा देणारे नव्हते, तर त्या घोषणांच्या मागचं जगणं समजून घेणारे होते. ओबीसी चळवळ त्यांच्या साठी एखादी राजकीय ओळख नव्हती. तर ती त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची कृतीशील वाट होती. मंडल आयोगाची अंमलबजावणी हा आज अनेकांसाठी इतिहासाचा भाग आहे. पण त्या काळात, गावोगावी फिरताना, लोकांना “आरक्षण” हा शब्द समजावून सांगणं हे फक्त माहिती देणं नव्हतं; तो ओबीसींचा आत्मसन्मानाचा लढा होता. अन्सारी अनेकदा सांगायचे की, “आपल्याला दिलं जात नाही, आपण घेतोय ते आपलं हक्काचं आहे.” या वाक्यात राग नव्हता, पण एक खोलवरची जाणीव होती. शतकानुशतकांच्या मागासलेपणाची. २०२४ मध्ये मुंबईतील ऐतिहासिक खिलाफत हाऊसमध्ये त्यांच्या “मंडलनामा” या आत्मचरित्राच प्रकाशन झालं. हे केवळ त्याचं आत्मकथन नसून, भारतातील मुस्लिम ओबीसी चळवळीचा एक अस्सल दस्तऐवज आहे. कर्पूरी ठाकूर यांच्यासारख्या महान नेत्यांसोबत ज्यांनी ओबीसींना बिहारमध्ये आरक्षण देऊन ओबीसी चळवळीचा कृतीशील पाया रोवला, त्यांच्याबरोबर शब्बीर भाई यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. शब्बीर भाई शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय राहिले. संविधानाचे रक्षण आणि जातीनिहाय जनगणना या मागण्यांसाठी त्यांनी देशभर जनजागृती केली.”जोपर्यंत आमची जनगणना होत नाही, तोपर्यंत आमची भागीदारी सुनिश्चित होऊ शकत नाही,” अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या कामात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते ‘नेतृत्व’ करत नव्हते, तर, चळवळीत कृतीशील जीवन जगत होते. मोठ्या सभांपेक्षा त्यांना लोकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी महत्त्वाच्या वाटायच्या. एखाद्या गावात दोन-तीन तरुण भेटले, तरी ते तासन्‌तास त्यांच्याशी बोलत बसायचे. त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नच करत नव्हते; तर, ते त्यांना विचार करायला भाग पाडायचे. “तुम्ही स्वतःला कसं पाहता?” हा त्यांचा नेहमीचा प्रश्न होता. कारण त्यांच्या मते चळवळीचा पाया बाहेर नाही; तो माणसाच्या स्वतःबद्दलच्या जाणिवेत असतो, असं ते नेहमी सांगत. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हता. ओबीसी चळवळीला नेहमीच दोन टोकांवरून दबाव सहन करावा लागला; एकीकडे सत्तेच्या राजकारणाने तिला वापरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे समाजातच असलेल्या अंतर्गत विभागणीने तिची धार बोथट केली. शब्बीर भाई या दोन्ही गोष्टींबद्दल प्रामाणिक होते. ते उघडपणे बोलायचे की, “आपण बाहेरच्या अन्यायाशी लढतो, पण आतल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करतो.” ही आत्मचिकित्सा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग होती. त्यांच्या आयुष्यात ‘यश’ ही संकल्पना वेगळीच होती. पद, प्रतिष्ठा, सत्तेचा वावर या गोष्टींनी त्यांना कधी आकर्षित केले नाही. उलट, त्यांनी अनेकदा संधी नाकारल्या, कारण त्यांना वाटायचं की त्या चळवळीच्या स्वायत्ततेला बाधा आणतील. ही भूमिका सोपी नव्हती; कारण त्यात वैयक्तिक तोटा होता. कदाचित, म्हणूनच त्यांच्या शब्दांना वजन होतं. ते जे बोलायचे, ते त्यांनी जगलेलं असायचं. त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणींतून एक गोष्ट वारंवार समोर येते ती त्यांची शांततापूर्ण जिद्द. ते मोठ्या आवाजात राग व्यक्त करत नसत, पण त्यांच्या नकारात एक ठामपणा असायचा. कुठलीही तडजोड केवळ सोयीसाठी करायची नाही, हा त्यांचा नियम होता. त्यामुळे काही वेळा ते एकटे पडले, गैरसमज झाले. पण त्यांनी कधीच आपली दिशा बदलली नाही.आज, त्यांच्या जाण्यानंतर, ओबीसी चळवळीसमोरचा प्रश्न अधिक कठीण आहे. कारण लढा अजूनही संपलेला नाही; तो फक्त स्वरूप बदलून समोर येतो आहे. शिक्षण, रोजगार, प्रतिनिधित्व हे मुद्दे अजूनही ज्वलंत आहेत. पण त्याहून मोठा प्रश्न आहे, चळवळीची वैचारिक स्पष्टता टिकवणं. शब्बीर भाई यांची उणीव इथे प्रकर्षाने जाणवते. कारण ते केवळ मुद्दे मांडत नव्हते, तर त्या मुद्द्यांना दिशा देत होते. त्यांच्या जाण्याने आपण काय गमावलं, हे मोजणं कठीण आहे. पण कदाचित अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण काय शिकलो? त्यांनी आपल्याला शिकवलं की चळवळ म्हणजे केवळ आंदोलन नाही; ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ज्यात प्रश्न विचारावे लागतात, स्वतःलाही आणि समाजालाही.शब्बीर भाई यांची आठवण ठेवायची असेल, तर ती स्मरणरंजनात नाही, तर कृतीत ठेवावी लागेल. त्यांच्या प्रामाणिकपणाने, त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेने. त्यांच्या जाण्यानंतर उरलेली शांतता ही केवळ शोकाची नाही; ती एक जबाबदारीची जाणीव आहे. त्या शांततेत जर आपण नीट ऐकलं, तर कदाचित त्यांचा आवाज अजूनही ऐकू येईल, “लढा चालू ठेवा, पण का लढतोय हे विसरू नका.”

COMMENTS