Homeताज्या बातम्यासंपादकीय

डॉ. हरी नरके : अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळतो !

अतिशय संघर्षातून महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ चालवणारे व्याख्याते, विचारवंत आणि वैचारिक संपादक प्राध्यापक डॉ. हरी नरके यांच्या अकाली निधनाने, महा

सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि पेच !
तिसरी फेरी निर्णायक !
आता कर्नाटकचेही शैक्षणिक धोरण !

अतिशय संघर्षातून महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ चालवणारे व्याख्याते, विचारवंत आणि वैचारिक संपादक प्राध्यापक डॉ. हरी नरके यांच्या अकाली निधनाने, महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या त्रासाने ते आजारी असताना, मल्टीस्पेशलिटी म्हणविल्या जाणाऱ्या लिलावती हॉस्पिटल सारख्या रुग्णालयात त्यांच्या आरोग्याची हेळसांड झाल्याचे, त्यांनी त्यांचे मित्रवर्य डॉ. संजय सोनवणे, यांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झालेले दिसते. याचा दुसरा अर्थ असा होतो की बहुजन समाजाच्या विचारवंत, लेखक, कार्यकर्ते, आंदोलक यांचं आरोग्य राखण्याचं काम व्यवस्थेतील वैद्यक विभाग कसा करतो आहे, याची ती एक मोडस ऑपरेंडी  म्हणून लक्षात येते. त्यामुळे या प्रकरणाकडे अतिशय गंभीरपणे पाहिले पाहिजे. प्राध्यापक डॉ. हरी नरके यांनी त्यांच्या जीवनाला टाटा समूहातून एक कामगार म्हणून सुरुवात केली. बघता – बघता काही वर्षातच ते महाराष्ट्राच्या प्रमुख विचारवंतांच्या रांगेत जाऊन बसले. ही गोष्ट बहुजन समाजाला अभिमानास्पद आहे. त्यांनी कोणत्याही गोष्टीत आपली स्पष्ट मते मांडण्याचा स्वभाव, त्यात कधीही तडजोड केली नाही. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे नमूद करत असतानाच, त्यांच्या अगदी उदयन्मुख काळामध्ये महाराष्ट्रात बेहरे – गांगल प्रवृत्तीने महात्मा ज्योतिबा फुले यांची बदनामी करणारा लेख लिहिला होता. त्या लेखा विरोधात रस्त्यावर उतरून  जनआंदोलन करणारे हरी नरके, हे महाराष्ट्राच्या निवडक आंदोलकांपैकी एक प्रमुख आंदोलक होते. त्या आंदोलनाची परिणती बेहेरे – गांगल यांना महाराष्ट्राची विनाश्यर्त माफी मागावी लागली होती. पुन्हा महाराष्ट्रातलं एक मिसरूड महात्मा ज्योतिबा फुले यांची बदनामी करण्यासाठी गरळ ओकला. त्या विरोधात पुन्हा प्राध्यापक डॉ. हरी नरके यांनी आपल्या त्या ३०-३५ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या आठवणी सोशल मीडियावर ताज्या पद्धतीने वायरल केल्या होत्या. हरी नरके यांना फार कमी वयातच महाराष्ट्राच्या मंत्रालयातील महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तके प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर पुणे येथील विद्यापीठांतर्गत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन विभागाचे ते प्रमुख होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य महाराष्ट्र भरातून गोळा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी देखील त्यांच्याकडे विचारांप्रमाणेच माहितीचाही मोठा साठा होता. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन झाले. परंतु, त्यांनी या आरक्षणाला वैचारिक पातळीवर विरोध केला. तो विरोध त्यांनी अंतिम क्षणापर्यंत निभावला. ओबीसी चळवळ चालवत असताना, त्यांचे आंदोलन करत असताना त्यांच्याविषयी वैचारिक लेखन करत असताना, अलीकडच्या काळामध्ये ते काहीसे निराशही झाले होते. कारण, ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते, नोकऱ्यांमध्ये असणारे अनेक अधिकारी केवळ वैयक्तिक कामासाठी चळवळीची आठवण करतात; परंतु,  चळवळींना जिवंत ठेवण्यासाठी ते कुठल्याही प्रकारे साधनसामग्रीची मदत करत नाही, याची खंत त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार व्यक्त केली होती. फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर त्यांचा जितका गाढा अभ्यास होता, तितकी  नाविन्यपूर्ण माहितीही बाहेर आणणं, हा त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे महाराष्ट्रात प्रबोधनाच्या चळवळीत ते अतिशय लोकप्रिय वक्ते आणि व्याख्याते म्हणून ओळखले जात. वयाचे केवळ 59 वर्षे पूर्ण करून साठाव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं होतं. प्रचंड ऊर्जा आणि कृतिशील राहण्याची जिद्द, असा उत्साही व्यक्तिमत्त्वाचा धनी असूनही त्यांना अकाली मृत्यूने गाठल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे. त्यांच्या जाण्याने वैचारिक क्षेत्रातील एक अशी पोकळी निर्माण झालेली आहे की, त्यामध्ये कोणत्याही पातळीवर जाऊन वैचारिक विरोध करण्याचे साहचर्य जे त्यांच्यात होतं ते पुन्हा निर्माण होणे नाही! महाराष्ट्रात खरी लोकप्रियता लाभलेला व्याख्याता हरपला!

COMMENTS