मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारणात खळबळ उडवली असून, या प्रकरणाशी संबंधित नावे समोर येताच सत्ताधा

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारणात खळबळ उडवली असून, या प्रकरणाशी संबंधित नावे समोर येताच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांच्या विरोधात टीकेची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी चौकशीत नाव आलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिल्याने पुढील घडामोडींना वेग आला आहे.
नाशिक पोलिसांनी महिलांना गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात याला अटक केली असून न्यायालयाने त्याला काही दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे व एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा उल्लेख होत असल्याने त्यांच्यावर टीका अधिकच तीव्र झाली आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेत्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले असून चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, चौकशीत दोषी आढळणार्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई केली जाईल. यात राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो, असे त्यांनी सूचित केले. दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयावर तत्काळ भाष्य करण्याचे टाळले. योग्य वेळी भूमिका मांडू, असे सांगत त्यांनी या प्रश्नावर अधिक चर्चा टाळली. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तथापि, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS