अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे तब्बल १७१० कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक दि. १७ मार्च २०२६ रोजी स्थायी समि

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे तब्बल १७१० कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक दि. १७ मार्च २०२६ रोजी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांच्याकडे आयुक्त यशवंत डांगे यांनी सादर केले. या अंदाजपत्रकातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा मानस स्पष्ट झाला आहे.
या आर्थिक वर्षात वेतन व भत्ते १६१ कोटी ९० लाख, पेन्शन व सेवा उपदान ७१ कोटी ५० लाख, पाणीपुरवठा वीज बिल ४५ कोटी, स्ट्रीट लाईट ८ कोटी, शिक्षण विभाग ६ कोटी ५० लाख, महिला व बालकल्याण २ कोटी ५५ लाख, अपंग पुनर्वसन २ कोटी ५५ लाख, मागासवर्गीय कल्याण ८ कोटी ४१ लाख, सदस्य मानधन ६३ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, प्रभाग स्वेच्छानिधी ९ कोटी ६२ लाख, कचरा संकलन व वाहतूक २० कोटी अशा विविध बाबींवर खर्च करण्यात येणार आहे.
तसेच पाणीपुरवठा साहित्य, टँकर व्यवस्था, अशुद्ध पाणी नियंत्रण, अग्निशमन वाहने, नवीन रस्ते, रस्ते दुरुस्ती, इमारत दुरुस्ती, नालेसफाई, आपत्कालीन व्यवस्थापन, वृक्षारोपण, कचरा डेपो सुधारणा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, मालमत्ता सर्वेक्षण, उद्यान दुरुस्ती अशा विविध विकासकामांवरही मोठा निधी खर्च होणार आहे.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बाबरमळा ते लोखंडी पुलापर्यंत काम सुरू होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काटवणं खंडोबा येथे ५०४ घरकुलांचे अपार्टमेंट प्रकल्प उभारले जाणार असून प्रत्येक घराची किंमत १३ लाख ४५ हजार रुपये असून त्यात अडीच लाख अनुदान मिळणार आहे.
शहरात ई-बस सेवा सुरू करण्यासाठी १२ कोटी ४५ लाख मंजूर झाले असून एकूण ४० बस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० बस सुरू होणार आहेत. कचरा डेपो येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ७ कोटी ५८ लाखांचा मान्सून शेड, नेहरू मार्केटसाठी ८ कोटी ९ लाख, रंगभवन येथे २८ कोटींचा शॉपिंग कॉम्प्लेक्स, तसेच प्रोफेसर कॉलनीत ३५ कोटींचा बीओटी तत्त्वावरील प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
याशिवाय पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ४५० कोटी व भूमिगत गटार योजनेसाठी ६०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, आकाश कातोरे, मनोज दुल्लम, सोनाबाई शिंदे, संध्या पवार, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे, गौरी बोरकर, मुख्यलेखाधिकारी मेहेर लहारे, उपायुक्त शहाजहान तडवी, गणेश लयचेट्टी, अनिल लोंढे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘असे’ आहे आर्थिक नियोजन
अंदाजपत्रकानुसार महसुली उत्पन्न ४८१ कोटी ०४ लाख रुपये तर भांडवली जमा ११६१ कोटी ४२ लाख रुपये अपेक्षित आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी १०३ कोटी ८० लाख, करावर आधारित उत्पन्न ८९ कोटी ७० लाख, जीएसटी अनुदान १५१ कोटी ९२ लाख, इतर अनुदान १७ कोटी २७ लाख, गाळा भाडे ३ कोटी ९३ लाख, पाणीपट्टी ३३ कोटी, मीटरद्वारे पाणीपुरवठा २० कोटी आणि इतर उत्पन्न ४२ कोटी ३९ लाख यांचा समावेश आहे. भांडवली कामांसाठी अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा मिळून ११६१ कोटी ४२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत.

COMMENTS