Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील चार ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विधानभवनासह, शेअर बाजार, मुंबई उच्च न्यायालयाचा समावेश

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेला धक्का देणारी घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या एका स

ओबीसींनो जागे व्हा, तुमचं आरक्षण संपलंय : हाके ; केवळ न्यायालयीन लढाई पुरेशी नाही, रस्त्यावर उतरावे लागेल
गॅसटंचाईचे संकट आणि सरकारची कसोटी
विधानभवनासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेला धक्का देणारी घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या एका संदेशाद्वारे महाराष्ट्र विधानभवन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सकाळी सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली. संदेश मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत विधानभवन परिसरात शोधमोहीम सुरू केली.

सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला विधानभवनात येणार्‍या कर्मचार्‍यांना प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आले. त्यानंतर ओळखपत्रांची पडताळणी आणि सुरक्षा तपासणीनंतर कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने आत सोडण्यात आले. पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांनी परिसराची सखोल पाहणी केली. या प्रकरणाबाबत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, गुरूवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास अधिकृत मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्या संदेशात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. धमकीत केवळ विधानभवनाचाच उल्लेख नसून मुंबईतील आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये शेअर बाजाराची इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई मेट्रो आणि एका बँकेचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या सर्व ठिकाणांना बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी उडवून देण्याची धमकी दिल्याने शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलिस तसेच विशेष सुरक्षा पथकांकडून विविध भागांत तपासणी मोहीम राबवली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे विधानभवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान, या संदेशामागे कोण आहे आणि तो नेमका कुठून पाठवण्यात आला याचा शोध पोलिस घेत आहेत. प्राथमिक तपासात काही संघटनांच्या हालचालींचा धागा मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृतरीत्या त्याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

COMMENTS