मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना संदेश देत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्था

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना संदेश देत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या युगात मराठीसमोर उभ्या राहिलेल्या व्यापक संधींकडे लक्ष वेधले. मराठी भाषिकांसह महाराष्ट्रात वास्तव्यास राहून मराठीचा सन्मान करणार्या आणि ती बोलण्याचा प्रयत्न करणार्या सर्वांनाच त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात झपाट्याने घडत असलेल्या बदलांचा संदर्भ देताना त्यांनी अलीकडे देशात आणि जगभरात सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख केला. दिल्लीत पार पडलेल्या परिषदांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर, मर्यादा आणि भविष्यासंदर्भात सखोल विचारमंथन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘अँथ्रोपिक’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे जागतिक स्तरावर नव्या घडामोडींना वेग आल्याचे त्यांनी नमूद केले. या संस्थेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले राहुल पाटील हे मराठी व्यक्तिमत्त्व असल्याचा उल्लेख करत त्यांनी अभिमान व्यक्त केला. राज ठाकरे म्हणाले की, मानवजातीच्या इतिहासातील प्रत्येक टप्प्यावर साधनसामग्री बदलली आणि त्यानुसार शक्तीचे केंद्रही बदलले. शेतीच्या शोधानंतर जमीन महत्त्वाची ठरली, औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रसामग्री निर्णायक बनली आणि डिजिटल युगात विदा हे सामर्थ्य ठरले. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात ज्या भाषांमधून अधिकाधिक आणि दर्जेदार विदा निर्माण होईल, त्या भाषा प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळे स्वतःची लिपी, परंपरा आणि समृद्ध साहित्यभांडार असलेल्या मराठीसाठी हा अत्यंत निर्णायक क्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानप्राप्ती, संवाद आणि अर्थार्जन या तिन्ही स्तरांवर मातृभाषेचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठीतून मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण लेखन, ध्वनीमुद्रिका, दृश्य सामग्री आणि संदर्भसाहित्य तयार झाले, तर डिजिटल विश्वात मराठीचे स्थान अधिक भक्कम होईल, असे त्यांनी सांगितले. समाज माध्यमांवर मराठीतून अभिव्यक्त व्हा, आपल्या क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यास मराठीत नोंदवा, स्वतंत्र डिजिटल विश्वकोश उभारा आणि शैक्षणिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मराठीतून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या संधी कमी होतील, अशी भीती काही ठिकाणी व्यक्त होत असली तरी योग्य वेळी हे तंत्रज्ञान आत्मसात केले, तर मराठी युवक-युवतींसाठी नव्या शक्यता निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःची ओळख आणि भाषा जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS