चेन्नई : श्रीलंकेच्या नौदलाने पंबन परिसरात मासेमारीस गेलेल्या 12 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारां
चेन्नई : श्रीलंकेच्या नौदलाने पंबन परिसरात मासेमारीस गेलेल्या 12 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित मच्छिमारांनी बंदरातून अधिकृत परवानगी घेऊन समुद्रात प्रवेश केला होता, अशी माहिती पुढे आली आहे.
धनुषकोडी आणि थलाईमन्नार दरम्यानच्या समुद्रकिनार्याजवळ पोहोचताच श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या मोटरबोटीला वेढा घातला. त्यानंतर बोट जप्त करून सर्व मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पुढील कारवाईसाठी मन्नार येथील नौदल छावणीत हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. कच्छतीवू उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अटकेबाबत एआयटीयूसी संलग्न मच्छिमार संघटनेने तीव्र निषेध नोंदविला आहे. संघटनेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष सेंथिलवेल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात रामेश्वरम आणि मंडपम भागातील मच्छिमारांना कच्छतीवू व नेदुंथीवू परिसरात मासेमारी करत असताना अडवून अटक केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे किनारी गावांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अलीकडेच केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून मच्छिमारांच्या सतत होणार्या अटकप्रकरणी केंद्राने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

COMMENTS