कोपरगाव शहर : कुंभारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत श
कोपरगाव शहर : कुंभारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेस विविध भौतिक सुविधा भेट दिल्या. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी युवा मंचच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांकडून देणगी संकलित करून शाळेतील स्टेज दुरुस्तीसाठी 30 हजार रुपये, आरो फिल्टर प्लांटसाठी 1 लाख 50 हजार रुपये, एका माजी विद्यार्थिनींकडून 25 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, तर एका माजी विद्यार्थ्याकडून सीसीटीव्ही स्क्रीन भेट देण्यात आली. तसेच 15 हजार रुपये खर्चून शाळेच्या कमानीचे रंगकाम व नावाचे पेंटिंग करण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेसाठी 85 हजार रुपये किमतीची अत्याधुनिक साऊंड सिस्टिम देण्यात आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.
भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासावरही माजी विद्यार्थी विशेष भर देत आहेत. नियमितपणे गेस्ट लेक्चर, तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स व आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात. याच अनुषंगाने यावर्षी प्रो. विजय बनकर सर यांचे प्रेरणादायी व्याख्याने व करिअर आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते. माझा गाव माझी शाळा माझी जबाबदारी या भावनेतून माजी विद्यार्थी एकत्र येऊन पुढाकार घेण्यात आला त्यास ग्रामस्थ माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आर्थिक योगदान मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहे आज साऊंड सिस्टिमचा संच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल डी.एन व शिक्षक वृंद यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आला. या आधुनिक साऊंड सिस्टिममुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम, परिपाठ व विविध शालेय उपक्रमांसाठी या उपकरणांची नितांत गरज होती, असे नमूद करत माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

COMMENTS