इथे ओशाळले मृत्यू

Homeसंपादकीय

इथे ओशाळले मृत्यू

कोणत्याही गावात, शहरांत नैसर्गिक मृत्यू किती होतात, यानुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे ओटे, विद्युत दाहिन्यांची संख्या किती हे ठरलेले असते.

प्रतीके आणि वारसा
संविधानाचा सांस्कृतिक संघर्ष !
तृणमूल काँग्रेसचा दिल्लीतला चेहरा पुन्हा घरी!

कोणत्याही गावात, शहरांत नैसर्गिक मृत्यू किती होतात, यानुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे ओटे, विद्युत दाहिन्यांची संख्या किती हे ठरलेले असते. शहरांची, गावांची लोकसंख्या पाहून दवाखाने आणि तत्संबंधी सुविधांची निर्मिती होत असते. अपघात हे त्याला अपवाद असतात; परंतु अपघात रोजच होत नसतात. कोरोनाने मात्र रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधे, अमरधाम या व्यवस्था किती अपुर्‍या आहेत, हे दाखवून दिले. 

अंत्यसंस्कार करणार्‍यांच्याही हृदयाला पाझर फुटावा, अशी दृश्ये दररोज दिसायला लागली आहेत. रुग्णालयातील खाटा हाऊसफुल्ल, रिक्षा, खुर्चीवर ऑक्सिजन लावून उपचार घेण्याची दृश्ये, कोणत्याही रुग्णालयात जागाच न मिळाल्याने होणारे रुग्णांचे मृत्यू, ऑक्सिजन, ठराविक इंजेक्शन न मिळाल्याने होणारे मृत्यू हे पाहिले, तर मृत्यूने मानवांच्या सर्व प्रयत्नांवर कशी मात केली आहे, असेच एकूण हताश चित्र दिसते. कोरोनाने उपचारांतही दरी निर्माण केली आहे. काही ठिकाणी तर दिवसेंदिवस स्मशानभूमीतील रांगाच संपायला तयार नाहीत. रुग्णांच्या नातेवाइकांचे हताश चेहरे, काहीही करू न शकल्याची भावना आणि सुकलेले डोळे असे हृदयाला पाझर फोडणारे दृश्य सर्वत्र दिसते आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचे भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामूहिक संसर्ग होत आहे. काही दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर आठ जणांवर अंत्यंसस्कार करावे लागले होते. तसाच प्रकार अहमदनगरमध्येही घडला. अहमदनगरच्या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत, तर दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे एक दिवस झाले असते, तर समजण्यासारखे आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज हेच चित्र आहे. सुरतमध्ये तर याहून भयंकर स्थिती आहे. अशा शेवटच्या प्रवासातही काही गिधाडी वृत्ती दिसतात. सुरतमधील एका स्मशानभूमीत तर टोकन घेऊनही दोन दोन दिवस अंत्यसंस्कार होत नाहीत. त्यामुळे तिथे टोकनासोबत दोन हजार रुपयांची लाच घेऊन अंत्यसंस्कार लवकर करण्याची गिधाडी वृत्ती दिसून आली. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणजे तरी दुसरे काय? अहमदनगर महापालिकेकडे एकच शववाहिनी आहे. नैसर्गिक मृत्यूच्या काळात ती पुरेशी असते; परंतु गेल्या वर्षापासून ती कमी पडते आहे. आणखी एक शववाहिका घेण्याचा ठराव होऊनही तो प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळे एकाच वेळी एकावर एक रचून सहा मृतदेह स्मशानभूमीत आणण्याची वेळ आली. ही स्थिती केवळ नगरमध्येच आहे, असे नाही, तर सुरतमध्येही तेच घडले. जादा शववाहिन्या असूनही मृत्यूंची संख्याच इतकी मोठी आहे, की एकाच शववाहिनीत मृतदेह एकावर एक रचून आणावे लागत आहे.

अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या आठ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगरपालिकेवर आली. अंबाजोगाई नगरपालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या आठ जणांना अग्निडाग दिला. बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता समूहसंसर्ग उच्छाद मांडत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले, तरी परिस्थिती अद्याप आटोक्यात येत नाही. अंत्यसंकरसाठी औरंगाबादच्या स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी होत चित्र आहे. जागा मिळेल तिथे नातेवाइक दाहसंस्कार करत आहेत. टीव्ही सेंटर स्मशानभूमीत सर्वत्र पेटलेल्या चिंतांचे चित्र आहे. एक चिता विझण्याआधीच दुसरी चिता पेटत आहे. कोरोना मृतांचा आकडा वाढल्यामुळे स्मशानभूमीतही मरणासन्न स्थिती आहे. तिकडे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्येही भीषण परिस्थिती आहे. कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्याने मृत्यूच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील तापीनदीच्या स्मशानभूमीत दररोज दहा ते पंधरा मृत्यदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील वखारीत लाकडाचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून लाकडाचा साठा मागवून व्यवस्था केली जात आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या ही धडकी भरवणारी आहे. ही परिस्थिती एकट्या महाराष्ट्रातच नव्हे तर शेजारच्या गुजरातमध्येही आहे. गुजरातमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुरतमध्ये कोरोनाच्या प्रकोपामुळे हाहा:कार उडाला आहे. याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार सुरु आहेत. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे, की चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली आहेत. शेजारच्या बरडोली शहरातदेखील अशीच परिस्थिती आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून स्मशाभूमींमध्ये अहारोत्र मृतदेह जळत आहेत. अश्‍विनीकुमार आणि रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा ओघ जास्त आहे. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज शंभराहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत काम करत असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दिवसाला स्मशानभूमीत 20 मृतदेह येत असत. यापैकी काही मृतदेहांना लाकडांवर अग्नी दिला जात असे, तर उर्वरित मृतदेहांचा दाहसंस्कार विद्युतदाहिनीमध्ये होत असे; मात्र सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला 80 मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या धगधगत्या राहत आहेत. प्रत्येक विद्युतदाहिनीचा वापर थोडयाथोड्या वेळाने केला जात असला, तरी मृतदेहांची संख्याच इतकी जास्त आहे, की या विद्युतदाहिन्या सतत सुरु आहेत. त्यामुळेच या विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्या आहेत.

COMMENTS