शासकीय महापूजा, अभिवादन करून साधेपणाने साजरी होणार शिवजयंती बीड । प्रतिनिधी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, दिवंगत लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या आक
शासकीय महापूजा, अभिवादन करून साधेपणाने साजरी होणार शिवजयंती
बीड । प्रतिनिधी
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, दिवंगत लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे बीड येथे बीड शहर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने दरवर्षी साजरे होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान सकाळी 7:00 वा. होणार्या शासकीय महापूजा आणि अभिवादन सभेस मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बीडचे आ संदीप क्षीरसागर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर च्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या 30 वर्षांपासून बीड शहरात, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहराच्या आयोजनातून डीजेमुक्त आणि वर्गणी मुक्त असणारी शिवजयंती, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आदर्श पद्धतीने साजरी केली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवकालीन मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वीच दिवंगत लोकनेते स्व.अजित दादा पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक आणि दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवत, यावर्षी शिवजयंती कोणतेही जल्लोषी कार्यक्रम न करता साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
परंपरेप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा
परंपरेप्रमाणे सकाळी 7:00 वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहरचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी तसेच विविध मान्यवर यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि अभिवादन करून साधेपणाने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शासकीय महापूजा आणि अभिवादन कार्यक्रमासाठी दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:00 वा. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.

COMMENTS