Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड तालुक्यात मोफत वाळू वितरणातून घरकुलधारकांना मोठा दिलासा

पारगाव सिरस व अथरवन पिंपरी येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते वाळूचे वितरणबीड । प्रतिनिधीतालुक्यात राज्य शासनाच्या मोफत वाळू वितरण धोरणाम

Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला
स्वाराती’ त हजसाठी जाणार्‍या भाविकांची वैद्यकिय तपासणी सुरू करा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन

पारगाव सिरस व अथरवन पिंपरी येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते वाळूचे वितरण
बीड । प्रतिनिधी
तालुक्यात राज्य शासनाच्या मोफत वाळू वितरण धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत आहे. घरकुल बांधकामासाठी लागणारी वाळू मिळवताना येणारा आर्थिक ताण, अवैध वाळू उपशाची अडचण आणि वाहतुकीचा अतिरिक्त खर्च या सगळ्यांतून लाभार्थ्यांची सुटका होत असल्याचे चित्र बीड तालुक्यात प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या वाळू धोरणाची बीड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर हे विभागस्तरावर वेळोवेळी आढावा घेत मार्गदर्शन करत असून, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हास्तरावर संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. घरकुलधारकांना मोफत वाळू मिळालीच पाहिजे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्यासोबत बैठका घेत प्रशासनाला योग्य दिशा दिली आहे. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क ठेवत वाळू उपलब्धता, प्रस्ताव आणि वितरण याबाबत समन्वय साधला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच प्रभारी गौण खनिज अधिकारी नरेंद्र कुलकर्णी यांनीही या प्रक्रियेला प्रशासकीय पाठबळ दिले आहे. बीड तालुक्यात घरकुल योजनेंतर्गत एकूण 25 हजार 353 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 23 हजार 386 घरकुलांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात 19 हजार 875 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. सध्या सुमारे 7 हजार 100 घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या घरकुल बांधकामासाठी वाळू हा अत्यावश्यक घटक असल्याने मोफत वाळू वितरणाचा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरत आहे. बीड तालुक्यासाठी एकूण दहा वाळू घाट निश्चित करण्यात आले आहेत. सिंधफणा नदीपात्रावरील रंजेगाव, रामगाव, बर्‍हाणपूर, आडगाव, कुक्कडगाव, खुंड्रस, साक्षाळ पिंपरी येथे वाळू उपलब्ध आहे. तसेच अंधापुरी, पिंपळादेवी, नागापूर बु., खांडे पारगाव व पारगाव सिरस येथील नव्याने नोंदणी केलेल्या प्लॉटमधूनही वाळू उपलब्ध करून दिली जात आहे. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी अथरवन पिंपरी जवळील टुकूर नदीपात्रात खांडे पारगाव येथील घरकुल लाभार्थ्यांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते मोफत वाळूचे वितरण करण्यात आले. त्यानंतर गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पारगाव सिरस येथील डोंबरी नदीपात्रात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात आली. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शेळके यांनी दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली. या टप्प्यात सुमारे 600 ब्रास वाळूचे वितरण करण्यात येत असून, जशी-जशी वाळू उपलब्ध होईल तशी अधिक लाभार्थ्यांना वाळू देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पारगाव सिरस येथे छबुराव हरिभाऊ चव्हाण, शांताबाई बाजीराव नवले, राजाभाऊ गिरजाप्पा जमदाडे आणि जालिंदर बापूराव कणसे यांना मोफत वाळूचे वाटप करण्यात आले. ग्राम महसूल अधिकारी विजय बहिर यांनी सांगितले की, एकूण 18 लाभार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात 4 लाभार्थ्यांना वाळू देण्यात आली असून, सुमारे 90 ब्रास वाळूचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ-शेळके यांनी सांगितले की, शासनाचा उद्देश स्पष्ट आहे-घरकुलधारकांना कोणत्याही दलालांशिवाय आणि अतिरिक्त खर्च न करता वाळू मिळावी. प्रत्यक्ष पाहणी करूनच प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्याशी समन्वय ठेवून लाभार्थ्यांची यादी व गरज निश्चित केली जात आहे. पारगाव सिरस येथे सरपंच जानकाबाई दिनकर जमदाडे, रामकिसन श्रीमंत वाटमोडे, संजय गव्हाणे, बंडू गरड, कुंडलिक गोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. घर बांधायचं स्वप्न होतं, पण वाळूसाठी पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न होता. आता प्रशासनाने थेट मोफत वाळू दिल्यामुळे घर उभं राहण्याचा आत्मविश्वास आला, अशी भावना एका लाभार्थ्याने व्यक्त केली. तर शासन आमच्यासोबत उभं आहे, हे आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं, असे मत अनेक घरकुलधारकांनी व्यक्त केले. अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई आणि दुसरीकडे पारदर्शक पद्धतीने मोफत वाळू वितरण यांचा समतोल राखत बीड जिल्ह्यात प्रशासन काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिथे गरज खरी, तिथे प्रशासन उभं हा विश्वास निर्माण करणारा हा उपक्रम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचा विश्वास तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी व्यक्त केला.

COMMENTS