वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे संबंध चांगले असल्याचा दावा करत आगामी काळात दोन्ही देशांदरम्यान करार होण्याची

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे संबंध चांगले असल्याचा दावा करत आगामी काळात दोन्ही देशांदरम्यान करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सुमारे 40 दिवसांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण शांततेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या वक्तव्याकडे धोरणात्मक बदल म्हणून पाहिले जात असून ट्रम्प यांनी यू टर्न घेतल्याचे बोलले जात आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, परिस्थिती अनुकूल राहिल्यास इराणसोबतचा संभाव्य करार अंतिम करण्यासाठी ते पाकिस्तानात जाऊ शकतात. यामुळे पश्चिम आशियातील घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र संबोधले. दोन्ही नेत्यांमध्ये अलीकडेच दूरध्वनीवर चर्चा झाली असून ती अत्यंत सकारात्मक झाल्याचे त्यांनी नमूद केले. या चर्चेत पश्चिम आशियातील तणाव, तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला. दरम्यान, इस्रायल-लेबनान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी संपर्क साधला आहे. त्यांनी लेबनानचे राष्ट्रपती जोसेफ आउन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. या चर्चेत युद्धविराम कायम ठेवण्यावर आणि तणाव कमी करण्यावर भर देण्यात आल्याचे समजते. आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका प्रथम या भूमिकेवर आधारित दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला. त्यांनी याला डोनरो सिद्धांत असे संबोधले असून, हा दृष्टिकोन जेम्स मुनरो यांच्या ऐतिहासिक मोनरो सिद्धांताशी संबंधित असल्याचे मानले जाते. 1823 मध्ये मुनरो यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध करत अमेरिकेतील हस्तक्षेपाला कठोर प्रतिसाद देण्याची भूमिका मांडली होती. त्याच धर्तीवर अमेरिकेच्या हितसंबंधांना प्राधान्य देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असल्याचे दिसते. ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेत मोठी घट झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की संघर्षादरम्यान इराणच्या नौदलाचे मोठे नुकसान झाले असून अनेक जहाजे बुडाली आहेत. तसेच, इराणी कमांडर घोलमरेजा सुलेमानी यांना लक्ष्य केल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांना अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार धरले.
करारासाठी आशावादी
युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी काहीशी अनिश्चितता व्यक्त केली असली, तरी लवकरच इराणसोबत करार होण्याबाबत ते आशावादी असल्याचे दिसते. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखणे हेच अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी आठवड्याच्या शेवटी दोन्ही देशांमध्ये चर्चेची पुढील फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS