मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नेतृत्वाबाबतच्या चर्चांना प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादी क

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नेतृत्वाबाबतच्या चर्चांना प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी सध्या पक्षाच्या विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचेही स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या विविध तर्क-वितर्कांवर बोलताना पटेल म्हणाले की, या काळात पक्षाची संघटनात्मक व कायदेशीर प्रक्रिया नीट पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे. अध्यक्षपदाची चर्चा किंवा सत्ता-संघर्ष हे सध्या प्राधान्याचे विषय नाहीत, असे त्यांनी सूचित केले.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह आपण सुनेत्रा पवार यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्णपणे पवार कुटुंबाच्या पाठीशी आहे, ही भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली, असेही ते म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी पक्षातील जबाबदारी स्वीकारण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पटेल यांनी नमूद केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेवर सध्या अनेक चर्चा सुरू असल्याचे मान्य करत पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ही संघटना आणि विधीमंडळ पक्ष असे दोन स्तर असलेला पक्ष आहे. विधीमंडळाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता संघटनात्मक निर्णय योग्य पद्धतीने घेतले जातील. बाहेरून येणार्या वक्तव्यांमुळे गोंधळ निर्माण केला जात आहे. मात्र, पक्षाचा निर्णय पक्षच घेईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जबाबदारी स्पष्ट, पण अध्यक्षपद नको
एका केंद्रीय मंत्र्याने चुकून आपले नाव अध्यक्षपदासाठी घेतल्याचा उल्लेख करत पटेल म्हणाले की, त्यावर संबंधितांनी खेद व्यक्त केला आहे. मी कार्याध्यक्ष आहे आणि त्यामुळे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, अध्यक्ष होण्याची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS