नांदेड । प्रतिनिधीनांदेड येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य नगरी येथे आयोजित 21वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात व विचारप्रवर्तक वा

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य नगरी येथे आयोजित 21वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात व विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे गटनेते ना. हेमंत पाटील यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आयुष्य वाया घालवण्यापेक्षा पुस्तकांच्या जवळ जाऊन स्वतःला घडवणे आणि राष्ट्रउभारणीत योगदान देणे ही काळाची गरज आहे.
आजचा काळ आत्मचिंतनाचा असून देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. मात्र दिशाहीनता व व्यसनाधीनतेकडे झुकणारी तरुणाई चिंताजनक आहे. योग्य मार्गदर्शनासाठी आणि प्रगल्भ जीवनासाठी पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही. साहित्य हे माणसाला विचार, संस्कार आणि मूल्यांची दिशा देते, असे त्यांनी प्रतिपादन केले. संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने झाली. पारंपरिक वेशभूषा, लेझीम, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ जिवंत देखाव्याने दिंडी विशेष लक्षवेधी ठरली. विविध साहित्यिक उपक्रम, कथाकथन, कवी संमेलन आणि संवाद सत्रांना रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. संमेलनादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना लोकसंवाद जीवनगौरव व लोकसंवाद पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीमुळे संमेलनाचा परिसर गजबजून गेला होता. विविध पुस्तक व सांस्कृतिक स्टॉल्समुळे संमेलनाची उंची अधिकच वाढली. लोकसंवाद परिवार व आयोजकांच्या सुयोग्य नियोजनामुळे हे साहित्य संमेलन केवळ कार्यक्रम न राहता विचारांची चळवळ ठरले.

COMMENTS