धुळे महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध उमेदवारांवरून सध्या राज्याच्या राजकारणात तापलेली चर्चा सुरू आहे. धुळ्यातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

धुळे महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध उमेदवारांवरून सध्या राज्याच्या राजकारणात तापलेली चर्चा सुरू आहे. धुळ्यातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादाला थेट आणि टोचणार्या भाषेत प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला. आमच्या विजयामुळे काहींना मिरची लागत असेल, तर त्यात आमची काय चूक? असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या ‘लोकशाहीच्या खुनाच्या’ आरोपांना आव्हान दिले.
महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी, हायकोर्टात याचिका आणि सत्ताधार्यांवर दबावाचे आरोप करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टीकेतील दुहेरी निकष उघड करत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला-लोकसभेत पूर्वी 35 खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यातील बहुतांश काँग्रेसच्या काळात. तेव्हा लोकशाही सुरक्षित होती आणि आज नगरसेवक बिनविरोध आले म्हणून लोकशाहीचा खून झाला, हा युक्तिवाद कितपत सुसंगत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा वाद केवळ आकड्यांचा नाही, तर राजकीय सोयीचा आणि नैतिकतेचाही आहे. बिनविरोध निवड हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असला, तरी त्यामागची राजकीय परिस्थिती, विरोधकांची ताकद, कार्यकर्त्यांची तयारी आणि सत्तेचा प्रभाव यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रत्येक वेळी बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीचा गळा दाबला गेला, असा सरधोपट आरोप करणेही तितकेच धोकादायक ठरू शकते.
धुळे शहराच्या विकासावर भर देताना फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजना, पायाभूत सुविधा आणि आगामी विकासाचे स्वप्न मांडले. राजकीय टोलेबाजीच्या पलीकडे जाऊन, धुळेकरांनी दिलेल्या विश्वासाला विकासाच्या रूपाने उत्तर देऊ, असा संदेश त्यांनी दिला. विकासकामांचा लेखाजोखा मांडताना त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर विशेष भर देत, प्रत्येक घरात दररोज स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा संकल्प जाहीर केला.

COMMENTS