भाजपाचे महत्त्वाचे दोन शिलेदार शिवसेनेत दाखल - तरोड्यात भाजपाला मोठा धक्कानांदेड । प्रतिनिधीनांदेड उत्तर विधानसभा आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच

भाजपाचे महत्त्वाचे दोन शिलेदार शिवसेनेत दाखल – तरोड्यात भाजपाला मोठा धक्का
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड उत्तर विधानसभा आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर येऊ लागला आहे. शिंदे गडाचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात बंडखोरीचा झेंडा उभारणार्या देशमुखांच्या तथाकथित बंडखोर गटाला मोठी गळती लागली असून, या गटातील दोन महत्त्वाचे शिलेदार भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत दाखल झाले आहेत. या घडामोडीमुळे तरोडा परिसरात भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. राणे व माळगे यांच्या भाजप त्यागाचा फायदा प्रभाग क्रमांक एक मधील शिवसेनेचे उमेदवार सुहास कल्याणकर यांना झाला आहे.
यामुळे सध्या शिवसेनेच्या गोटामध्ये आनंदीआनंद आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2017 पासून भाजपसाठी सक्रियपणे काम करणार्या सुनील राणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, भाजपाची पूर्णतः काँग्रेस झाल्यामुळे उद्विग्न झाले आहे. यामुळे वैचारिक अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यामुळेच त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप व तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्षपदाचा स्वेच्छेने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या विकासाभिमुख कार्यामुळे आपण प्रभावित झालो असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम केल्यास प्रभागाचा व शहराचा मोठ्या प्रमाणावर कायापालट होऊ शकतो याची प्रचिती आली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या तरोडा मंडळाचे अध्यक्ष सुनील राणे आणि भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष उमेश माळगे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा स्पष्ट निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकेकाळी मिलिंद देशमुख यांच्या बंडखोरीत खंबीरपणे उभे राहिलेले हे दोन्ही नेते भाजपातून बाहेर पडल्याने, भाजपातील असंतोष आणि खदखद किती खोलवर पोहोचली आहे, हे अधोरेखित झाले आहे. नांदेड विधानसभा बंडखोरीच्या वेळी वापरले गेले आणि नंतर दुर्लक्षित केले गेले, अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये होती. त्याच नाराजीचा स्फोट सुनील राणे आणि उमेश माळगे यांच्या शिवसेना प्रवेशातून झाला आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सुनील राणे हे पंचायत समितीचे माजी उपसभापती असून त्यांनी दोन वेळा तरोडा मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या पाठीमागे मोठी कार्यकर्त्यांची फौज आणि भाजपाच्या बूथ प्रमुखांचा मजबूत संच असल्याचे मानले जाते. ग्रामीण भागात भाजपावर त्यांची चांगली पकड असून, त्यांच्या बाहेर पडण्यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. उमेश माळगे हे युवा वर्गात प्रभावी नेतृत्व मानले जात असून, त्यांच्या निर्णयामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप सोडताना दिलेल्या राजीनामा पत्रात सुनील राणे यांनी भाजपाचे काँग्रेसीकरण झाले असून, काँग्रेसयुक्त भाजपमध्ये काम करणे अशक्य झाले आहे, असा थेट आरोप केला आहे. या शब्दांनी भाजपातील अंतर्गत संघर्ष, वैचारिक गोंधळ आणि कार्यकर्त्यांची खदखद उघड झाली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा करणार्या भाजपामध्ये आज कार्यकर्त्यांचा सन्मान, निष्ठा आणि संघटनात्मक शिस्त यांचा अभाव जाणवत असल्याची टीका आता उघडपणे होत आहे. या गळतीचा थेट परिणाम महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीनमध्ये दिसून येण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. एकूणच, भाजपातील अंतर्गत वाद, बंडखोर गटांची पडझड आणि कार्यकर्त्यांची वाढती नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली असून, नांदेडच्या राजकारणात ही घडामोड महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाला सुनील राणे यांनी भाजपा नेते तथा भाजपाचे उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख यांच्याबरोबर उपस्थिती दर्शविली होती. महानगरपालिका निवडणुकीमधील भाजपाची उमेदवारी नाकारताना भाजपाने राणे यांची चिखलीकर यांच्याशी असणारी जवळीकता असल्याचे कारण सांगितले होते परंतु भाजपाच्या एका नेत्याला वेगळा न्याय व मला वेगळा न्याय कसा ? हा मुद्दा आता उपस्थित केला आहे. भाजपा नेतृत्वाची संकुचित विचारसरणी कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये पुढे जाऊ देत नसल्याचा आरोप अनेक भाजपाचे कार्यकर्ते करत आहेत. संकुचित व्यक्तीचे राजकारण व कार्यकर्त्यांचे खच्चीकरण पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसीकरण झाल्यानंतर वाढले असल्याची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर यांनी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी व नांदेडचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे आम्हाला सोपे जाणार असल्याचे राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगितले आहे.

COMMENTS