Homeताज्या बातम्यादेश

व्हॉलीबॉल म्हणजे समन्वय, संयम आणि संघभावनेचे प्रतीक – पंतप्रधान मोदी 

72 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटनवाराणसी : व्हॉलीबॉल हा केवळ चेंडूचा खेळ नसून तो संयम, परस्पर सहकार्य आणि संघभावनेचा संदेश देणारा खेळ

मोदींचे राजकारण सूडाचे नव्हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाचेच !
रोजगार मेळाव्यात 71 हजार उमेदवारांना नोकरी
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज नाना पटोले l DAINIK LOKMNTHAN

72 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
वाराणसी : व्हॉलीबॉल हा केवळ चेंडूचा खेळ नसून तो संयम, परस्पर सहकार्य आणि संघभावनेचा संदेश देणारा खेळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वाराणसी येथे आयोजित 72 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे त्यांनी रविवारी आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
डॉ. संपूर्णानंद क्रीडा स्टेडियममध्ये जमलेल्या हजाराहून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांशी संवाद साधताना, वाराणसीचे खासदार म्हणून पंतप्रधानांनी सर्वांचे स्वागत केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. काशीच्या सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. व्हॉलीबॉलच्या स्वरूपावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या खेळात टीम फर्स्ट हाच खरा मंत्र असतो. प्रत्येक खेळाडू वैयक्तिक यशापेक्षा संघाच्या विजयाला प्राधान्य देतो. समन्वय, आत्मविश्‍वास आणि तयारी या तीन गोष्टींवरच यश अवलंबून असते. हाच दृष्टिकोन आज देशाच्या प्रगतीतही दिसून येत आहे, असे त्यांनी नमूद केले. देशाच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छता अभियानापासून डिजिटल व्यवहारांपर्यंत आणि ‘विकसित भारत’च्या संकल्पनेपासून ‘इंडिया फर्स्ट’ या सामूहिक भावनेपर्यंत देश वेगाने पुढे जात आहे. भारताच्या आर्थिक वाटचालीचे जागतिक पातळीवर कौतुक होत असले, तरी ही प्रगती केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर देशाच्या आत्मविश्‍वासाचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा आत्मविश्‍वास क्रीडा क्षेत्रातही प्रकर्षाने जाणवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत विविध खेळांतील भारतीय खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावत असून, आंतरराष्ट्रीय क्रीडांगणावर तिरंगा फडकताना पाहणे अभिमानास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले. नमः पार्वती पतये हर हर महादेव या घोषाने भाषणाची सुरुवात करताना, पंतप्रधानांनी सांगितले की देशातील प्रत्येक क्षेत्र सुधारणा एक्सप्रेसवर स्वार झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, खेलो इंडिया धोरण 2025 यांसारख्या उपक्रमांमुळे खर्‍या प्रतिभेला संधी मिळेल आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित तरुणांना शिक्षण व करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने काशीचे क्रीडा नकाशावरील महत्त्व वाढत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी यापूर्वी येथे झालेल्या जी-20 बैठकांपासून सांस्कृतिक महोत्सव आणि एनआरआय अधिवेशनांपर्यंतच्या उपक्रमांचा उल्लेख केला. या कार्यक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

———–
काशी हा खर्‍या अर्थाने क्रीडाप्रेमींची भूमी
काशीने परंपरेने अनेक नामवंत खेळाडू देशाला दिले असल्याचे सांगताना, बीएचयू, यूपी कॉलेज आणि काशी विद्यापीठातील खेळाडूंच्या योगदानाचा त्यांनी गौरव केला. कुस्ती, बॉक्सिंग, नौकास्पर्धा, कबड्डी यांसारख्या खेळांची समृद्ध परंपरा असलेली काशी ही खर्‍या अर्थाने क्रीडाप्रेमींची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील 28 राज्यांतील संघांचा सहभाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे जिवंत चित्र उभे करतो, असे सांगून पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंना यशस्वी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या काशीच्या लौकिकात ही स्पर्धा भर घालेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS