आ. आशुतोष काळे; १० कोटींचा निधी;भूमिपूजन उत्साहात कोपरगाव : तालुक्यातील वेस-सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वा

आ. आशुतोष काळे; १० कोटींचा निधी;भूमिपूजन उत्साहात
कोपरगाव : तालुक्यातील वेस-सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. वेस सोयेगाव येथे १० कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.०१) पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी जलसंधारण खात्याकडून १० कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचे काम पूर्ण होवून साठवण तलावाची उंची साधारणपणे दोन मीटरने वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिल्यामुळे जलदगतीने चाऱ्यांची कामे सुरू असून, काकडी, मल्हारवाडी आणि डांगेवाडी येथे चारी क्रमांक ३ मधून पाणी मिळत आहे. तसेच चारी क्रमांक ४ आणि टेल लाईनचे काम चालू आहे, या तिन्ही चाऱ्यांमधून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होवून संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.
पूर चारीच्या माध्यमातून परिसरातील सर्व बंधारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. यामुळे एका ठिकाणाहून पाणी सोडल्यास सर्व बंधारे भरतील आणि नागरिकांना पिण्याच्या तसेच शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल.
झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा रोड अवजड वाहतूक जास्त असल्याने खराब झाला आहे. हा संपूर्ण रस्ता सहा ते सात फुट खोल उकरून सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून निधी मंजूर करून रस्त्याचे काम मीच पूर्ण करणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

COMMENTS