पाटण / प्रतिनिधी : सरत्या वर्षाला निरोप देताना पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली रंगीत-संगीत पार्ट्या, मद्यपान व उत्सव शहरांसह ग्रामीण भागातही रु
पाटण / प्रतिनिधी : सरत्या वर्षाला निरोप देताना पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली रंगीत-संगीत पार्ट्या, मद्यपान व उत्सव शहरांसह ग्रामीण भागातही रुजू लागले आहेत. मात्र, याच प्रवाहाला छेद देत संस्कारक्षम, व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने आंबेघर (कोयनानगर) येथील श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट गेल्या तीन दशकांपासून 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत आगळ्या-वेगळ्या पध्दतीने करत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद लाभत आहे.
आजच्या धावत्या युगात अध्यात्म, माणुसकी व संयम जपणारी संख्या घटत असून चंगळवादाला खतपाणी घालणारी जीवनशैली बळावत चालली आहे. व्यसन करणे ‘फॅशन’ असल्याचा गैरसमज पसरवला जात असून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण वाढत आहे. नववर्ष स्वागतासाठी घर व गावापासून दूर जाऊन हॉटेल, रिसॉर्टमध्ये रंगीत-संगीत पार्ट्यांचा कल वाढला आहे. यामध्ये मित्रमंडळींसह कुटुंबीयही सहभागी होताना दिसतात. याच रात्री बेदरकार वाहन चालकामुळे अपघात व गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते.
या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गरम्य परिसरात आंबेघर गावाजवळील उंच टेकडीवरील स्वामी समर्थ मठ नववर्ष स्वागतासाठी आशेचा, परिवर्तनाचा संदेश देतो. येथे 31 डिसेंबरची सुरुवात पहाटे काकड आरतीने होते. दिवसभर महाभिषेक, स्वामी चरित्र पारायण, गुरुकृपा याग, हवन, नामजप, दीपोत्सव व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. रात्री 8 वाजता जोतिबा प्रासादिक भजनी मंडळ, पट्टणकोडोली (कोल्हापूर) यांचे संगीत भजन आयोजित करण्यात आले आहे.
दारू व नशीले पदार्थ सेवन करून नववर्ष साजरे करण्याऐवजी येथे रात्री 12 वाजता उपस्थित भाविकांना दुधाचे वाटप करून निरोगी व सकारात्मक नववर्षाचा संकल्प करण्यात येतो. हा विधायक उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविला जात असून सहभागही लक्षणीय वाढत आहे.
‘दारू सोडा, संसार जोडा’या ब्रीद वाक्याशी सुसंगत कार्य श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. स्वामी समर्थांची शपथ, अध्यात्मिक मार्गदर्शन व मानसिक परिवर्तनाच्या मंत्रातून आजवर हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्यात आले आहे. विनामूल्य व निःस्वार्थ सेवा देणार्या या ट्रस्टचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे.

COMMENTS