अहिल्यानगर : दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक समाजातील एक मुख्य घटक आहेत. त्यांच्यासाठी शासन विविध कल्याकारणी योजना राबवून त्यांच्यात स्वत्वाची
अहिल्यानगर : दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक समाजातील एक मुख्य घटक आहेत. त्यांच्यासाठी शासन विविध कल्याकारणी योजना राबवून त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण होण्यास विशेश प्रयत्न करत असते. त्यादृष्टीने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिव्यांग्रांपती,ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशील राहून त्यांना आधार देण्याचे काम केले पाहिजे. जेणेकरून ते समाजात ताठ मानेने उभे राहून आनंदी आयुष्य जगतील. नगर जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकरी, कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगांप्रती तसेच ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळा घेण्यात आली. वर्ग एक, वर्ग दोन अधिकाऱ्यांसाठी झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवीदास कोकाटे, सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार,मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात देवीदास कोकाटे यांनी सांगितले की, शासकीय अधिकाऱ्यांनी दिव्यांगांचे हक्क,कायदे, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींबाबत अधिक संवेदनशील राहून काम करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टिने या कार्यशाळेत दिव्यांग हक्क अधिनियमन, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन, सुगम्य भारत, ज्येष्ठ नागरिक कायदा, कौशल्य विकास योजना, विविध कल्याणकारी योजना याबाबत विविध तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांप्रती सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तळमळीने काम करणे अपेक्षित आहे. त्यांना शिक्षणासह समाजाचा एक भाग म्हणून अभिमानाने उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. दिव्यांग कल्याण निधीचा जिल्हा परिषदेमार्फत योग्य विनियोग करून दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना समाधानाने आनंदी आयुष्य जगण्यास प्रोत्साहन मिळेल. या कार्यशाळेत विधी अधिकारी राजेश मोरे, डॉ.दीपक अनाप, डॉ.जी.पी.शेख, संजय साळवे, शुभदा पाठक आदींनी विविध विषयांवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी संजय साळवे सामाजिक कार्यकर्ता यांनी आभार मानले.

COMMENTS