Homeताज्या बातम्यासंपादकीय

जागतिकरणात जगाला लपेटणारा अमेरिका रडीचा डाव खेळतोय!

कधीकाळी ब्रिटिशांचा सत्तेचा सूर्य जगात कुठे मावळत नव्हता; मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर परिस्थिती बदलली आणि जगामध्ये दोन महासत्ता निर्माण झाल्या.

कावळ्यांची उपासमार होऊ नये म्हणून?
निवडणूक आयोग मुत्सद्दी होतोय का ?
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य !

कधीकाळी ब्रिटिशांचा सत्तेचा सूर्य जगात कुठे मावळत नव्हता; मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर परिस्थिती बदलली आणि जगामध्ये दोन महासत्ता निर्माण झाल्या. परंतु, या दोन महासत्तांपैकी १९९० चे दशक येता येता सोवियत युनियन असलेला रशिया कोसळला आणि त्याचे जवळपास १७ तुकडे झाले. यानंतर जगामध्ये एकमेव महाशक्ती राहिली ती म्हणजे अमेरिका!  यानंतर अमेरिकेने जगभरामध्ये आपली आर्थिक क्षेत्रातील दादागिरी सुरू केली. त्याचा परिणाम गॅट करार व  डंकेल प्रस्ताव या माध्यमातून जगावर जागतिकरणाची एक आर्थिक सत्ता राबवण्यात आली. मात्र, या जागतिकीकरणातून जगातील गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ यांची मात्र मोठ्या प्रमाणात आदान-प्रदान झाली. जगाला या जागतिकीकरणाचा एक लाभ मिळायला लागला.  डॉ. रावसाहेब कसबे सारखे विचारवंत भारतात म्हणायला लागले की, ज्यांच्या पूर्वजांना शिळ्या भाकरीचे तुकडे देखील खायला मिळत नव्हते; त्यांच्या नव्या पिढ्या – त्यांची नातवंड आज अमेरिकेसारख्या महासत्तेमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करोडोंनी पैसा कमवता आहेत. अतिशय स्वाभिमानाने जगताहेत! ही गोष्ट याचं वास्तव आहे की, जागतिक कारणाने जगभरातल्या तंत्रज्ञ आणि गुंतवणूकदारांची आदान-प्रदान झाली आणि त्यातून भारतातले तंत्रज्ञ अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गेले. मात्र, अमेरिकेने ही भारत आणि चीन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून माहिती तंत्रज्ञान कंपन्या सुरू केल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय तंत्रज्ञांची भरती झाली. पण गेल्या  टर्म पेक्षाही अधिक आक्रमकपणे आपली सत्ता राबवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र, पुन्हा एकदा भारताविरोधात आपलं कडवेपण उगाळण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी अमेरिकन उद्योजकांना किंवा गुंतवणूकदारांना चीनमध्ये उद्योग सुरू करू नये आणि भारताचे तंत्रज्ञांना त्यामध्ये नोकरीसाठी ठेवू नये, अशी थेट उघड भूमिका घेतली. ज्या अमेरिकेने भारत आणि चीन सारख्या देशांनाही जागतिकीकरणाच्या वेढ्यामध्ये गुरफटवून घेतलं, तीच अमेरिका आता त्यांना या जागतिकीकरणाच्या लाभापासून लांब ठेवण्याची भूमिका जर घेत असेल, तर डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक पातळीवर अदखलपात्र होतील. किंबहुना, त्यांना त्यांचं आर्थिक आक्रमण हे अधिक कडवं करण्याची बुद्धी जरी सुचत असली तरी ते जगाच्या आणि अमेरिकेच्याही हिताचं नाही. एकदा जर का जागतिक क्षेत्रातील प्रत्येक देशाने विचार केला आणि त्यांनी आपले नवे गुंतवणूकदार उद्योजक आणि तंत्रज्ञ निर्माण केले तर अमेरिकेसारख्या देशाला येत्या काही काळामध्ये महासत्तेच्या स्थितीपासून पायउतार व्हावे लागेल. त्यातही आता चीन सर्व क्षेत्रात अमेरिकेला आव्हान देतो आहे. ऑलिंपिक सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये ही चीनने अव्वल दर्जा मिळवला आहे. लढाऊ तंत्रज्ञानामध्ये देखील चीनने अमेरिकेपेक्षा अधिक सरस उत्पादन करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामध्ये चीनने आपल्या देशाची भूमी मोठ्या प्रमाणात उत्पादक उद्योगांसाठी वापरायला दिल्यामुळे, चीनमध्ये उत्पादन  मोठ्या प्रमाणात वाढलं. चीनने जगाची बाजारपेठ काबीज केली. आज जगातल्या कुठल्याही देशांमध्ये जर आपण गेलो, तर, चीनमध्ये उत्पादित झालेल्या किंवा निर्मित झालेल्या वस्तूंची बाजारपेठ ही अधिक फुललेली दिसते. भारतीय बाजारपेठेंमध्ये देखील आपण रस्त्यावर किंवा दुकानांवर जाऊन जरी आपण सामान खरेदी करण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या वस्तू घेण्याचा प्रयत्न केला तर, त्यामध्ये चिनी बनावटीच्या वस्तू अधिक आहेत. ही सगळी बाब चीनला समृद्ध करणारी जशी ठरली; तसं, भारताच्या तरुणांना देखील अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थिरावणारी ठरली. त्यातून भारतीय कुटुंबांना ही सधनता आली. परंतु, ही सधनता डोनाल्ड ट्रम्प सारख्या राष्ट्राध्यक्षांना सहन होणारी नाही. त्यातून त्यांनी भारत आणि चीन या देशांच्या विरोधात आता गरळ ओकण्यास सुरू केली आहे.

COMMENTS