मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतांनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारलाच भिकारी

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतांनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारलाच भिकारी म्हटले आहे. याप्रकरणी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, कोकाए यांची मंत्रिमंडळातून गच्छंती करण्याची मागणी होत असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना अजित पवार म्हणाले की, मी यापूर्वीच त्यांना इजा झाले बिजा झाले आता तिजा होऊ देऊ नका याची जाणिव करून दिली होती. आता ते या प्रकरणी आपण ते खेळत नसल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांच्याशी सोमवारी समोरासमोर चर्चा करेन. त्यानंतर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईन, असे म्हणत अजित पवारांनी कारवाईचे संकेत दिले आहे. यावेळी अजित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल व्हिडिओ, हनी ट्रॅप प्रकरण, कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण, मराठी-अमराठी वाद आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. विशेषतः यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.
हनी ट्रॅपचे पुरावे द्या, चौकशी करू
विरोधकांनी राळ उठवून दिलेल्या हनी ट्रॅपवर बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की,विरोधकांनी पहिल्यांदा आपल्याकडे व्हिडिओ आहेत, पेनड्राईव्ह आहेत असा दम देणे बंद करावे. हे सर्वकाही एकदा बाहेरच येऊ द्या. कुणाकडे काय पेनड्राईव्ह आहे, कुणाकडे काय व्हिडिओ आहेत, कुणाकडे आणखी काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे ही सर्व माहिती एकदा बाहेर येऊ द्या. त्यानंतर कोण कसे वागते हे सर्वांना कळेल, असा टोला पवार यांनी लगावला.

COMMENTS