Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

धर्मवीर दिघेंच्या नावाने 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’मंत्री सरनाईक यांची घोषणा ; राज्यात 60 वाहतूक उद्याने उभारणार

मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आह

एका महिन्यात नांदेड जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश1098 हेल्पलाईनच्या मदतीने महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा


मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राज्यभरात 60 ट्रफिक अर्थात वाहतूक उद्याने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी परिवहन विभागाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारले जाणार असून, सुमारे एक एकर क्षेत्रात विकसित होणार्‍या प्रत्येक उद्यानासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान मुलांमध्ये वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या उद्यानांमध्ये लहान रस्ते, झेब्रा पट्टे, वाहतूक संकेत दिवे, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जाणार असून, जबाबदार वाहनचालक घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाळांतील विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळेनुसार प्रवेश व्यवस्था ठेवण्यात येणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनाचाही संदेश
वाहतूक उद्यानांमध्ये दुर्मिळ वृक्षांच्या जातींची लागवड करण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाचे पर्यावरणातील महत्त्व दर्शवणारी माहितीही तेथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक शिस्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचे धडेही नागरिकांना मिळणार आहेत. याशिवाय भविष्यातील विद्युत वाहनांच्या प्रतिकृती आणि त्याविषयीची माहितीही उद्यानात मांडली जाणार आहे. त्यामुळे ही उद्याने अबालवृद्धांसाठी ज्ञान, शिक्षण आणि विरंगुळ्याचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. या अभिनव उपक्रमामुळे बालवयापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होईल आणि सुरक्षित वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

COMMENTS