शिंदेंच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतील मजकुराने हळहळ, नगर अर्बन बँकेच्या वर्तुळात अस्वस्थताअहमदनगर/प्रतिनिधी- देवाला स्मरून सत्य सांगतो की, मी माझ्या आयुष्
शिंदेंच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतील मजकुराने हळहळ, नगर अर्बन बँकेच्या वर्तुळात अस्वस्थता
अहमदनगर/प्रतिनिधी- देवाला स्मरून सत्य सांगतो की, मी माझ्या आयुष्यात चोरी लबाडी केलेली नाही. माझी फक्त फसवणूक झालेली आहे. यामध्ये माझा काहीही दोष नाही. कृपया, मला माफ करा…अशी याचना करणारी गोरक्षनाथ शिंदे यांची मृत्यूपूर्व चिठ्ठी वाचल्यावर हळहळ व्यक्त होत आहे. नगर अर्बन बँकेच्या वर्तुळात शिंदे यांच्या आत्महत्येने अस्वस्थता पसरली आहे.
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील विशेष अधिकारी गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी मंगळवारी (दि. 27) विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, तिच्यातील मजकुराने त्यांच्यावर कोणाचा काही दबाव होता काय, या संशयाला पुष्टी मिळत आहे. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडलेले बनावट सोने तारण कर्ज प्रकरण त्यांनीच उघडकीस आणले होते. मात्र, त्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बनावट सोनेतारणाचा सुमारे साडेतीन ते चार कोटीचा घोटाळा उघडकीस आणणार्या शिंदे यांच्यावरच आत्महत्त्येची वेळ आल्याने बँकेच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.
अधिकारी-कर्मचारी धास्तावले
शिंदे यांनी मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना नगर अर्बन बँकेच्या नगरमधील मुख्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना समजल्यावर सर्वजण धास्तावले आहेत. बँकेत झालेल्या विविध घोटाळ्यांबाबत दोन गुन्हे पोलिसात दाखल झालेले आहेत. यापैकी एका म्हणजे तीन कोटीच्या चिल्लर घोटाळ्यात बँकेच्या काही कर्मचार्यांना अटकही झाली आहे. तर दुसर्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या कर्ज फसवणूक प्रकरणात बँकेचे माजी संचालक व कर्जदारांना अटक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, या प्रकरणाशी संबंधित अधिकारी असलेल्या शिंदे यांनीच स्वतःचे जीवन संपवल्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
तीन वर्षांपूर्वी त्यांचेच होते पत्र
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील विशेष अधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनीच तीन वर्षांपूर्वी शेवगाव शाखेत झालेला बनावट सोने तारण कर्ज घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी त्यांनीच बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांना 6 ऑगस्ट 2018 रोजी पत्र पाठवून त्यावेळी त्या शाखेत असलेल्या दोन ते अडीच हजार सोनेतारण पिशव्यांबाबत संशय व्यक्त केला होता. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, शेवगाव शाखेत विशाल दहीवालकर हे गोल्ड व्हॅल्युअर म्हणून काम करतात. शाखेतील सोनेतारण कर्ज खाते थकीत गेल्यामुळे मी खातेदारांशी संपर्क साधला असता सदरचे सोने आमचे नसून ते गोल्ड व्हॅल्युअर दहीवालकर यांचे आहे, असे त्यांनी सांगितले. गोरक्षनाथ काळे, नंदा काळे, वसंत मेरड या खातेदारांनी असे सांगितले तसेच शाखेत एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने कॅश क्रेडीट कर्ज व सोनेतारण कर्ज आहे. सदरच्या सोनेतारण पिशव्यांचे व्हॅल्युएशन विशाल दहीवालकर यांनी केलेले आहे. तसेच त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने सोनेतारण कर्ज आहे. त्यामुळे शाखेतील गोल्ड व्हॅल्युअर दहीवालकर यांनी केलेल्या सोनेतारण पिशव्यांबाबत मला संशय येत असून त्यांनी केलेल्या सोनेतारण पिशव्यांतील सोने खरे आहे की खोटे, हे तपासण्याची विनंती करीत आहे. तसेच शाखेत आजअखेर एकूण 5011 पिशव्या आहेत. त्यापैकी विशाल दहीवालकर यांनी व्हॅल्युएशन केलेल्या अंदाजे 2000 ते 2500 पर्यंत पिशव्या असतील, असा अंदाज आहे. तसेच शाखेतील बर्याच पिशव्या बर्याच वर्षापासून व्याज भरून नूतनीकरण होतात, असे शिंदे यांनी या पत्रात नमूद केले होते. त्यांचे हे पत्र तत्कालीन संचालक मंडळासमोरही ठेवले गेल्याचे सांगितले जाते. पण संचालक वा अधिकार्यांनी या पत्राची फारशी दखल त्यावेळी घेतली नसल्याने त्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा झडली होती.
असा आहे त्या चिठ्ठीतील मजकूर
शिंदे यांनी लिहिलेल्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत सोनेतारण कर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे. या चिठ्ठीतील मजकूर असा-देवाला स्मरून सत्य सांगतो की, मी माझ्या आयुष्यात चोरी लबाडी केलेली नाही. माझी फक्त फसवणूक झालेली आहे. बँकेत बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअर याच्यावर विश्वास ठेवून सोनेतारण व्यवहार होतात. त्यांनी परिक्षण मूल्यांकन केल्यानंतर तो दाखला देतो. त्याच्यावर विश्वास ठेवून कर्जदारांना सोनेतारण कर्ज मंजूर केले जाते व सदर सोनेतारण केलेली पिशवी ही खातेदारांच्या समक्ष सदरचे तारण दागिने पिशवीत ठेवले जातात व सदर पिशवी गोल्ड व्हॅल्युअर खातेदाराच्या समक्ष व शाखाधिकारी यांच्या समक्ष सीलबंद करून त्यावर खातेदाराच्या व गोल्ड व्हॅल्युअर सही घेतो व सीलबंद पिशवी शाखाधिकारी यांचे ताब्यात दिली जाते. या सर्व व्यवहारास गोल्ड व्हॅल्युअर जबाबदार असतो. कारण, त्याने सदरचे दागिने परिक्षण व मूल्यांकन केलेले असतात. तरी कृपया यामध्ये माझा काही दोष नाही. यामध्ये फक्त गोल्ड व्हॅल्युअर व खातेदार यांनी बँकेची फसवणूक केलेली आहे. यामध्ये माझा काही दोष नाही. माझी फसवणूक झालेली आहे. तरी कृपया मला माफ करावे, ही विनंती.
बँकेला अतिव दुःख-रेखी
बँकेच्या शेवगाव शाखेतील विशेष अधिकारी शिंदे यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेने बँकेला व अधिकारी-कर्मचार्यांना अतिव दुःख झाल्याची भावना बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार रोकडे यांनी व्यक्त केली. शिंदे यांच्या निवृत्तीनंतर त्यांना विशेष अधिकारी म्हणून शेवगावलाच नियुक्ती दिली होती. शेवगावच्या बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत बँकेचे तेथील विद्यमान शाखाधिकारी अनिल आहुजा यांच्यासमवेत शिंदे स्वतः काम करीत होते. रविवारी (25 जुलै) सायंकाळी नगरला त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात संबंधित फिर्यादीची प्रत दिली होती व सोमवारी (26 जुलै) सकाळी ते शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले होते. पण तेथील पोलिस निरीक्षक नगरला आले असल्याने ही फिर्याद मंगळवारी (26 जुलै) देण्याचे ठरले होते. त्यावेळी बँकेचे वकील अॅड. सुभाष काकडेही समवेत येणार होते, असे सांगून रेखी व रोकडे म्हणाले, पण मंगळवारी दुपारी शिंदे यांच्या मृत्यूची बातमी समजली व त्याचे खूप दुःख झाले. बँकेच्या श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी शाखेत सुमारे 8-10 वर्षांपूर्वी घडलेल्या सोनेतारण घोटाळा प्रकरणात बँकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना बराच त्रास झाला होता. त्यामुळे शेवगाव सोनेतारण घोटाळा प्रकरणात सर्व बाबी तपासून व वकिलांकडून तपासून घेऊन सर्व प्रक्रिया केली जात होती व त्यात शिंदे स्वतः सहभागी होते, असे सांगून रेखी व रोकडे म्हणाले, या सोनेतारण घोटाळा प्रकरणी त्यांचा काहीही संबंध नव्हता, कर्ज नूतनीकरणाच्यावेळी शाखाधिकारी म्हणून त्यांच्या सह्या असू शकतील. पण त्यांचा काहीही दोष नव्हता वा गुन्ह्यात त्यांचे नावही नाही. त्यामुळे या घोटाळ्याचा दबाव त्यांच्यावर असण्याचे काही कारण नाही. बाहेरचा काही दबाव असू शकतो, पण तो पोलिस तपासाचा भाग आहे, असेही भाष्य त्यांनी केले. दरम्यान, शिंदे 1988मध्ये बँकेत क्लार्क म्हणून नियुक्त झाले होते. त्यावेळी 110 मुलाखतकर्त्यांमधून निवडलेल्या 11जणांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी नगरसह जामखेड, कुकाणा, सोनई, शेवगाव या शाखांतून नोकरी केली व शेवगावचे शाखाधिकारी म्हणून तीन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर याच शाखेत विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
COMMENTS