प्रतीके आणि वारसा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रतीके आणि वारसा

प्रतीके आणि वारसा हा प्रत्येक संस्कृतीला जोडणारा दूवा असून, या वारशाला नेस्तनाबूत करून, आपले विचार इतरांवर थोपवण्याचे काम जगभरात अव्याहतपणे सुरू आहे.

प्रजासत्ताकापुरते प्रजासत्ताक
पोटनिवडणुकीचा घोळ
शेतकरी आंदोलनाचे 300 दिवस

प्रतीके आणि वारसा हा प्रत्येक संस्कृतीला जोडणारा दूवा असून, या वारशाला नेस्तनाबूत करून, आपले विचार इतरांवर थोपवण्याचे काम जगभरात अव्याहतपणे सुरू आहे. जगदगुरु संत तुकाराम महराजांच्या अभंगवाणीला तोड सापडले नाही म्हणून त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या विचाराला तोड सापडले नाही म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अर्थात, बंदुकीच्या गोळीने माणूस संपतो पण त्याचे विचार संपविता येत नाही, ही बाब महात्मा गांधी यांच्यापासून ते डॉ. दाभोळकर यांच्यापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे. पण, ही बाब या प्रवृत्तीच्या ध्यानात येत नाही, हे खरं दुर्दैव. ऑस्टे्रलियात नुकत्याच अनावरण केलेल्या महात्मा गांधीच्या पुतळयाची तोडफोड करण्यात आली. विशेष म्हणजे, या पुतळयाचे अनावरण होऊन काही तास झाले होते. त्यामुळे प्रश्‍न पडतो, ऑस्ट्रेलियासारख्या देशाला महात्मा गांधी नको आहेत का. ज्या व्यक्तीने आयुष्यभर, सत्याची पराकाष्ठा करत, अहिंसेवर भर देत आपले जीवन ब्रिटीशांसोबत लढा देत खर्ची घातले, त्या महात्मा गांधींना ऑस्ट्रेलियात विरोध होण्याचे काहीच कारण नाही. मात्र हा विरोध प्रतीके आणि वारसा या दोन प्रश्‍नांभोवती येऊन घुटमळतो.
विविध राजकीय नेत्यांच्या विचारांशी मत-मतांतरे असू शकतात. ही मत-मतांतरे आपण आपल्या विचारांनी खोडून काढण्याची गरज आहे. मात्र ज्यावेळेस विचारांचा लढा लढण्यासाठी कुवत नसेल, तेव्हा असे हल्ले घडतात. माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा कसा बनतो, याचे मूतिर्मंत उदाहरण. कमरेला पंचा आणि हातात काठी घेणार्‍या सामान्य शरीरयष्टीच्या या माणसाने कोणतेही शस्त्र हाती न घेता, फक्त एका विचारावर ब्रिटिशांची सत्ता उलथवली. गांधीजींच्या जीवनातील हे एक मोठे कार्य. अर्थात, फक्त इतकाच आशय गांधीजींच्या जीवनाला देता येणार नाही. तर या महामानवाने आपल्या आचारातून आणि विचारातून जगाला शांतता, मानवतावाद, बंधुभाव, अहिंसा आणि सहिष्णुतेच संदेश दिला. म्हणूनच त्यांचे विचार आजही अजरामर आहेत. किंबहुना, सध्यस्थितीत जगभरात वाढलेला हिंसाचार बघितला तर गांधीविचारांचे महत्व प्रकर्षाने जाणवते. आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज अधोरेखित होते. पण, हुतात्म्यांच्या स्मृती या आगीसारख्या असतात, काही वेळा त्या भडकतात तर काही वेळा भडकवतात. काळाच्या ओघात कधी तरी त्याच्यावर राखेचे थर जमून निखारे विझतात. नंतर हे हुतात्मे त्यांच्या तसबिरींमधून, चित्रांमधून आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढविण्याइतपत मर्यादित बनतात. हे सुद्धा एक वास्तव. त्यामुळे आज गांधीजींचा जयंतीदिन साजरा करत असताना महात्माजींकडून आपण काय शिकलो, त्यांची शिकवण कितपत आचरणात आणली. यावर अंतर्मुख व्हायला हवे. मात्र गांधी जेव्हा पचवता येत नाही, तेव्हा त्यावर असे हल्ले घडतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियात झालेल्या हल्ल्याकडे याच नजरेने बघता येईल. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. या घटनेबद्दल भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात निराशा आहे. ‘द एज’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे महावाणिज्य दूत ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसमवेत रॉविल येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर काही तासांनंतर ही घटना घडली. विचारांची लढाई विचारांनी करण्यापेक्षा विचार मांडणार्‍यालाच संपविण्याची राक्षसी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्यांमागेही हीच प्रवृत्ती होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतलेल्या प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्याच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या कारण ते समाजहिताचा विचार मांडत होते. त्यांच्या विचारला तोड सापडत नव्हता. म्हणून मग विचारवंतांचाच काटा काढण्यात आला. तसे पाहता ही प्रवृत्ती पुरातन काळापासून अस्तित्वात दिसून येते. महात्मा गांधीच्या पुतळयावरील हल्ला हा त्याच प्रकारातील असून, याची बीजे द्वेषात पसरलेली आहे.

COMMENTS