मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संबंधांविषयी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधी

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संबंधांविषयी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन गुरुवारी खा. शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना नव्याने वेग आला आहे. या भेटीनंतर विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले असून, आगामी काळातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
या भेटीदरम्यान राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, सहकार क्षेत्रासमोर असलेली आव्हाने, विविध सहकारी संस्थांशी संबंधित प्रश्न तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजाशी निगडित विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. शेतकरी, शिक्षण आणि सहकार क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले असून, ही भेट सामाजिक व विकासाभिमुख विषयांवर केंद्रित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांतील संबंध, संवाद आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत सातत्याने चर्चा सुरू असताना वळसे-पाटील यांची ही भेट लक्षवेधी ठरली आहे. शरद पवार यांचे दीर्घकाळ निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वळसे-पाटील हे सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात सक्रिय आहेत. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
राज्यातील आगामी निवडणुका, बदलती राजकीय परिस्थिती आणि पक्षीय घडामोडी यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संबंधांकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. त्यामुळे ही भेट केवळ शिष्टाचारापुरती मर्यादित नसून तिचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. यापूर्वी सुनील तटकरे यांनीही ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती, तर त्याआधी प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील संवादाचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS