कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही घरांना तेजी कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही घरांना तेजी कायम

देशातील कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मालमत्ता बाजाराला मात्र चांगले दिवस आहेत.

दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनवण्याचे कागद
पंतप्रधान मोदींना दाऊदचे गुंड ठार मारणार
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची विवेक कोल्हे यांनी केली पाहणी

मुंबई/प्रतिनिधी : देशातील कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मालमत्ता बाजाराला मात्र चांगले दिवस आहेत. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत घरांची विक्री आणि नवीन प्रकल्पांचे लॉचिंग यामध्ये वाढ झाली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी कंपनी नाइट फ्रँकच्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत 76 हजार सहा नवीन युनिट बाजारात लाँच करण्यात आले, तर टॉप आठ शहरांमध्ये फ्लॅटची विक्री 71 हजार 963 युनिट झाली. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि विक्रीमध्ये मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. 

प्रॉपर्टी मार्केटमधील आठ मोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, एनसीआर आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. नाइट फ्रँकच्या अहवालातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की 2020 च्या दुस-या तिमाहीपासून विक्रीत वाढ झाली आहे.  सलग दोन तिमाहीत घरांची विक्री वाढली आहे. अहवालात असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे, आहे की मार्केट आता उत्तमरित्या रिकव्हर होत आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) 71 हजार 963 प्रकल्पांची विक्री झाली, जी 2020 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 44 टक्के अधिक आहे. विक्रीत नेत्रदीपक वाढ झाल्याने विकासकांना नवीन प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. या कालावधीत एकूण 76 हजार सहा प्रकल्प सुरू करण्यात आले, जे जानेवारी ते मार्च 2020 च्या तुलनेत 38 टक्के जास्त आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि विक्री करण्याच्या दृष्टीने मुंबई आणि पुणे हे टॉप शहरांमध्ये होते. मुद्रांक शुल्कातील कपातीसारख्या सरकारी प्रयत्नांमुळे या दोन्ही शहरातील बाजाराला बराच आधार मिळाला आहे आणि विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. घर खरेदीदार मुद्रांक शुल्काच्या कपातचा फायदा घेण्यासाठी उत्सुक होते, तर विकासकांनीही या संधीचा फायदा घेऊन नवीन प्रकल्प सुरू केले. 2021 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये कर्नाटकने घर खरेदीदारांना 45 लाखांपर्यंतची घरे खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सूट मिळण्याचा लाभ दिला. तथापि, त्याचा परिणाम येत्या तिमाहीत दिसून येईल. विक्रीतील वाढीमुळे निवासी फ्लॅटच्या किंमतीतील घसरण रोखण्यास मदत झाली. विक्रीचा कल पाहता, 2020 मध्ये विक्रीच्या वाढीमध्ये डेव्हलपर्सकडून खरेदी करणार्यांना सूट व भेटवस्तू देण्याची भूमिका महत्त्वपूर्ण होती. तथापि, 2021 च्या पहिल्या तिमाहीत विकासकांकडून सवलत आणि गिफ्टच्या ऑफरमध्ये घट झाली. दुसरीकडे, हैदराबाद आणि एनसीआरमध्ये गेल्या एका वर्षात किंमतींमध्ये किंचित वाढ झाली. वस्तुतः जर तिमाही आधारावर पाहिले तर बहुतेक शहरांमध्ये घरांच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत, तर दक्षिण भारतातील चेन्नई आणि हैदराबाद शहरांमध्ये ते वेगवान असल्याचे दिसून आले.

नाइट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष शिशिर बैजल यांचे म्हणणे आहे, की,देशातील सर्व प्रमुख मालमत्ता बाजारात जानेवारी-मार्च 2021 दरम्यान विक्री वाढली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक वाढ झाली. या दोन बाजाराच्या भरपाईमुळे मुद्रांक शुल्कात कपात करण्यासारखे नियामक प्रोत्साहन मिळाले आहे. बैजल म्हणतात, की आता लोकांना त्यांचे घर हवे आहे. यासह गृह कर्जाच्या व्याजदरात कित्येक दशकांच्या तुलनेत सर्वात मोठी घसरण, घरांच्या किंमतीत घट आणि गृह बचतीत वाढ पाहता घर खरेदीदारांना असे वाटले, की घर खरेदी करण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. महामारीने ग्रासलेल्या 2020 मध्ये प्राथमिक बाजारपेठेतील एकूण घरांच्या विक्रीपैकी रेडी-टू-मूव्ह-इन (आरटीएमआय) घरांच्या विक्रीचा वाटा हा 21 टक्क्यांपर्यंत वाढला, जो त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेत 18 टक्के होता. प्रॉपटायगर डॉट कॉमच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. बांधकाम पूर्ण न झालेल्या प्रकल्पांमध्ये असलेले संभाव्य धोके टाळण्यासाठी बांधकाम पूर्ण झालेल्या सदनिका खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. रिअल इन्साईट रेसिडेन्शियल अ‍ॅन्यूअल राउंड-अप 2020 या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये प्रॉपटायगरने म्हटले आहे, की 2020 या वर्षामध्ये एकूण एक लाख 82 हजार 640 घरांची विक्री झाली व त्यापैकी 21 टक्के घरे ही आरटीएमआय या प्रकारची होती आणि 79 टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. 2019 मध्ये एकूण 3,47,590 घरांची विक्री झाली होती व त्यापैकी 18 टक्के घरे ही आरटीएमआय प्रकारची होती. आरटीएमआय प्रकारच्या घरांची खरेदी करण्याचा कल 2016 पासून वाढत असल्याचेही प्रॉपटायगरच्या संशोधन अहवालाचा निष्कर्ष आहे.

ग्राहकांचा वाढणारा आत्मविश्‍वास

सर्वसाधारणतः सुधारणा होत असलेल्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून, निवासी सदनिकांची मागणी आणि पुरवठा हे कोव्हिड-पूर्व काळातील पातळीवर पुन्हा येत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शांत झालेल्या कामगिरीनंतर 2020 वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये सदनिकांच्या विक्री आणि नवीन प्रकल्पांच्या लाँचमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही  दिसून येत आहे. सर्वेक्षणामध्ये 43 टक्के लोकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत तर 21 टक्के लोकांना मुदत ठेवी (एफडी) आणि 20 टक्के लोकांनी स्टॉक मार्केट गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. 

COMMENTS