कोरोनाचा महाराष्ट्रात चाललाय लपाछपीचा खेळ!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचा महाराष्ट्रात चाललाय लपाछपीचा खेळ!

लपाछपीच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाचा खेळ चालू आहे.

बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही – नाना पटोले 
वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार

मुंबई/प्रतिनिधीः लपाछपीच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाचा खेळ चालू आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनही गाफील राहिले. चार महिने कोरोनावर मात केली, कोरोना जणू संपला, अशा थाटात वावरणार्‍या आपल्या सर्वांना आता कोरोनाने चांगलेच खिंडीत गाठले असून, प्रशासनही टाळेबंदी सरसकट लागू करायची, मर्यादित लागू करायची, की लागूच करायची नाही, अशा चक्रव्यूहात अडकले आहे.

जरा रुग्णसंख्या कमी झाली, असे वाटत असतानाच गेल्या काही आठवड्यांपासून ती पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसांत दररोज सरासरी पन्नास हजार रुग्ण आढळत असून देशाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण 62 टक्क्यांहून अधिक झाले आहे. साथीच्या रोगांचे तज्ज्ञ यालाच साथीची ’दुुसरी लाट’ असे म्हणतात. संसर्गजन्य रोगांचा इतिहास पाहिला, तर अनेकदा या दुसर्‍या लाटेत आजाराच्या प्रसाराचा वेग आणि लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. महाराष्ट्रात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोव्हिडच्या उद्रेकाने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र होते; पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढते आहे. महाराष्ट्रात कोरोनाची साथ आली, तेव्हा तेव्हा सुरुवातीला शहरी भागांत रुग्णांचे प्रमाण जास्त होते. आता दुसरी लाट आल्यावर पुन्हा मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरी भागांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे; परंतु या वेळी ग्रामीण भागांत आणि विशेषतः विदर्भात रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. ग्रामीण भागांत काही आठवड्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते. मतदानासाठी अनेकजण गावी गेले तसेच प्रवासाचे प्रमाणही वाढले. याचा परिणाम कोरोनाच्या प्रसारावर झाला असल्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनेक निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले, मुंबईतल्या लोकल सुरू झाल्या. तसेच कोरोनाच्या साथीची पहिली लाट ओसरल्यावर लोकांनी काळजी घेण्यात ढिलाई दाखवली त्यामुळेही आकडे पुन्हा वाढत आहेत. विशेष म्हणजे टेस्टिंगच्या आकडेवारीचा विचार केला, तर देशात 19 मार्चपर्यंत एकूण 23 कोटी 13 लाख 70 हजार 540 तपासण्या झाल्या, त्यात केवळ सात टक्के म्हणजे एक कोटी, 79 लाख, 56 हजार 830 तपासण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशभराचा विचार केला, तर सध्या टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट साधारण पाच टक्के आहे, तर महाराष्ट्रात तो 14 ते 15 टक्के आहे. टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट जितका जास्त, तितका धोका जास्त असे ढोबळ गणित आहे. जास्त तपासण्या करूनही रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले, तर साथ नियंत्रणात आली असे मानता येऊ शकते.

अपुरे लसीकरण

साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासणीइतकेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे असते. म्हणजे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी किंवा विलगीकरण करणे; पण राज्यात पुरेसे काँटॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याची खंत केंद्रीय आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात जानेवारीपासून लसीकरणालाही सुरवात झाली आहे आणि वेगाने लसीकरण केले जाते. देशातील आकडेवारीच्या तुलनेत केवळ दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. रुग्णसंख्या मात्र 62 टक्के आहे.

COMMENTS