दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !

धराव्या आयपीएल सत्राच्या प्लेऑफ मध्ये जाण्याची सुवर्णसंधी दिल्ली कॅपिटल्सने गमावली आणि या संधीचा अनाहूत लाभ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मिळाला. स्पर्धेती

‘‘मै झुकेगा नही…”, जडेजानं मैदानातच केली ‘पुष्पा’ची रावडी स्टेप | LokNews24
भारताच्या फिरकीपटू समोर इंग्लंडची शरणागती
फलटण तालुक्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून जमिनदोस्त

धराव्या आयपीएल सत्राच्या प्लेऑफ मध्ये जाण्याची सुवर्णसंधी दिल्ली कॅपिटल्सने गमावली आणि या संधीचा अनाहूत लाभ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मिळाला. स्पर्धेतील आव्हान संपलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध शनिवारी वानखेडे स्टेडीयमवर खेळताना दिल्लीने एक सोपा ठरू पाहणारा विजय स्वतःच्या हातानेच अवघड करून पराभवही ओढवून घेतला आणि या नको असलेल्या नाट्याचा खलनायक होता दस्तुरखुद्द कर्णधार रिषभ पंत !           

रिषभ पंतला या सामन्यात प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावे लागणार हे नाणेफेक गमावली तेंव्हाच स्पष्ट झाले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या स्पर्धेत आपल्या लौकीकाच्या विपरीत कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला आपली गेलेली पत मिळविण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. त्याप्रमाणे ते खेळले व जिंकलेही ! 

दिल्लीने दिलेल्या १६० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मा तेरा चेंडू अडखळत खेळला व अवघ्या दोन धावांवरच बाद झाला. त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेवीस व ईशान किशनने (४८ धावा ) डाव सावरला असे वाटत असताना किशन बाद झाला. त्यानंतर ब्रेवीसचा २५ धावांवर अगदी सोपा झेल सोडून कर्णधार रिषभ पंतने दिल्लीला संकटात सोडले. मात्र शार्दूल ठाकूरने ब्रेवीसला पस्तीस धावांवर बाद करून दिल्लीकरांना दिलासा दिला. मात्र त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नवोदित फलंदाज टिम डेव्हीड एक फटका खेळताना चुकला व बॅटची हलकीशी कड घेवून चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंत कडे गेला. गोलंदाज नॉर्कियाने जोरदार अपिल केले. पंचानी अपिल फेटाळल्या नंतर रिषभ पंतने डिआरएस घेण्यात बेपर्वाई केली. त्यानंतर रिप्लेमध्ये डेव्हीड बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यावेळी पंतने तत्परता दाखवली असती तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. कारण टिम डेव्हीडने त्यानंतर अवघ्या अकरा चेंडूत चार षटकार व तीन चौकार ठोकून ४३ धावा काढल्या. शिवाय तिलक वर्मा ( २१ धावा ) सोबत केवळ वीस चेंडूत पन्नास धावांची भागीदारी करून मुंबईला संकटातून बाहेर काढले व पाच गडी राखून विजयी होण्यात मोठा हातभार लावला. रिषभने रिव्हयू घेतला असता तर मुंबई दबावात येऊन झटपट फलंदाज बादही झाली असते, कारण त्यावेळी मुंबईचे सर्वच प्रमुख फलंदाज बाद झाले होते. विशेष म्हणजे दिल्लीचे दोनही रिव्ह्यू शिल्लक होते. त्यानंतर फलंदाज बाद नसताना रिषभने रिव्ह्यू घेतला. मात्र तो वाया गेला.          एकंदर हा सामना दिल्लीला रिषभ पंतच्या गचाळ यष्टीरक्षण, अपरिपक्व नेतृत्व व संथ फलंदाजीमुळे गमवावा लागला. रिषभने ३८ चेंडूत केवळ ३४    धावा करून दिल्लीला धावगती न वाढवल्यामुळे १५ ते २० धावा कमी पडल्या.          दिल्लीकडून खेळताना पृथ्वी शॉने झोकात २४ धावा काढल्या. मात्र डेव्हीड वॉर्नर व मिचेल मार्श स्वस्तात परतल्याने ४ बाद ५० असे संकट आले होते, मात्र कर्णधार रिषभ व रोवमन पॉवेलने ४४ चेंडूत ७५ धावांची भागीदारी करून काहीशी परिस्थिती सुधारण्यास मदत केली. पॉवेलने ४३ व अक्षर पटेलने १० चेंडूत नाबाद १९ धावा करून १५९ अशी लढण्यास योग्य धावसंख्या उभी केली.          दिल्ली या पराभवाने स्पर्धेतून बाहेर झाली. तर आरसीबीचा प्ले ऑफचा रस्ता मोकळा झाला. सामना सुरू होण्यापूर्वी काही विघ्नसंतोषी लोकांनी मुंबई जाणून बुजून सामना हरेल व आरसीबीचा प्ले ऑफ मार्ग रोखेल असे चित्र रंगवले होते. परंतु मुंबईने जिगरीने खेळून विजय मिळविला. अशाच काही महाभागांनी रोहीत व कोहली यांच्या वादाचे दाखले देत मुंबई हरण्याचे भाकीत केले होते. मात्र रोहीत व विराट हे दोघेही अनुभवी व परिपक्व खेळाडू असून त्यांना देशासाठी पुन्हा एकत्र खेळायचे असल्याने ते वादात  पडणार नाहीत. हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. आयपीएल ही एक करमणूक लिग असून या खेळाडूंना नंतरचे दहा महिने एकत्रच खेळायचे आहे. तसेच दोघांनाही देशासाठी विश्वकप जिंकायचा आहे. तेंव्हा कारकिर्दीच्या उत्तरार्धात असलेल्या या दोनही खेळाडूंना देशासाठी एकत्र राहण्यासाठी त्यांच्यात नसलेले वाद लावण्यात कोणाही आगाऊपणा केला नाही तर ते देशहिताचेच ठरेल.

लेखक -डॉ.दत्ता विघावे क्रिकेट समिक्षक. इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

COMMENTS