Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकशाहीतील दुबळ्या झोळ्या !

राज्यातच नव्हे; तर, देशभरात घटनांचा क्रम इतका वेगवान आहे आणि त्या प्रत्येक घटनेतून उद्याच्या संभाव्य लोकशाहीची चिंता प्रत्येकाच्या मनात उभी राहते

आत्मस्तुतीत रमलेला अर्थसंकल्प !
तळाच्या ओबीसींचा प्रश्न शरद पवार घेतील का ?
सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!

राज्यातच नव्हे; तर, देशभरात घटनांचा क्रम इतका वेगवान आहे आणि त्या प्रत्येक घटनेतून उद्याच्या संभाव्य लोकशाहीची चिंता प्रत्येकाच्या मनात उभी राहते आहे. देशभरातील शेतकरी नऊ महिने आंदोलन करून ७०० शेतकऱ्यांना शहीद घडवून आंदोलनाची यशस्वी माघार घेत, घरी गेला होता! आता, शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी तो पुन्हा रस्त्यावर आला; पण, त्याचा रस्ता रोखण्यासाठी शासन स्तरावर असलेल्या रस्त्यांना खड्ड्याचं रूप देण्यात आलं. रस्त्यांमध्ये डबल भरलेल्या डंपर उभ्या करण्यात आल्या. बरॅकेटस् तर नावाला आहेतच आणि आधीपेक्षाही आता मोठमोठे खिळे ठोकून, महामार्गाला काटेरी कुंपणाचे स्वरूप आणले. ही परिस्थिती एका बाजूला, तर, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून सक्षम आघाडी च्या रूपात उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीचे खच्चीकरण ममता बॅनर्जी यांना वेगळे करून करण्यात आले. काल बिहार विधानसभेची बहुमत चाचणी देखील झाली. या चाचणीमध्ये सत्तेवर बसलेले देशासमोर अगदी मनी म्याऊ वाटले. पण, त्यात एक तरुण तेजस्वी यादवची गर्जना सबंध देशाला एक वेगळा विश्वास देणारी ठरली! महाराष्ट्रात तर गेली सत्तर वर्ष मराठा समाज सत्तेच्या गादीवर झोपलेला आहे.  मग या ७० वर्षात महाराष्ट्राची जी काही लूट झाली असेल, त्यांना लुटीचा हिशोब विचारणारा आजपर्यंत कोणी नव्हता! पण, ही लूट केल्याचे रेकॉर्ड आणि त्यावर यंत्रणांचा दबाव यातूनच, आता महाराष्ट्राच्या पक्ष फुटींना सुरुवात झाली आहे. अर्थात, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तर अक्षरशः शकले झाली आहेत. देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून उरलेल्या काँग्रेसच्याही आता महाराष्ट्रात चिंधड्या उडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेच्या राजकारणात मंत्रिपद भोगत मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेले, अशोक चव्हाण यांनी एका रात्रीत काँग्रेसला अंगठा दाखवत भाजपाच्या उंबरठ्यावर झुकले आहेत. ही सगळी परिस्थिती भारतीय नागरिकांच्या जनमनाला विचलित करणारीच आहे. राजकीय सत्ता ही संसदीय लोकशाहीची एक मोठी देण आहे. परंतु, आपल्या व्यक्तिगत स्वार्थापोटी सर्वच राजकीय पक्षांच्या सत्ताधारी जातवर्गाने या लोकशाहीला कमकुवत करण्याचे स्वरूप आणले आहे. राजकीय पक्ष सत्तेवर येतात आणि जातात. सत्ता कोणाची गुलाम नाही किंवा मिराजदारी नाही. चांगले काम केलं तर सत्ताही तुमच्या दारी पाणी भरणार आणि तुम्ही जनतेच्या विरोधात काम केलं तर ही सत्ता तुम्हाला बावन्न कोस दूर नेणार! जनता ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च सत्ता आहे; पण, या सत्तेचा सत्ताधारी जातवर्गाने कधीही गंभीरपणे विचार केला नाही. त्यामुळे आगामी निवडणुका या कोणत्याही राजकीय पक्षनेत्याच्या नेतृत्वाखाली होणार नसून, भारतीय समाजातील लोकांच्या नेतृत्वात या निवडणुका होतील. भारतीय लोक हे उघडपणे बोलत नसले तरी, कोणत्या वेळी कसं व्यक्त व्हायचं याची त्यांना चांगली जाण आहे. चहाच्या टपरीवर,  पान टपरीच्या ठेल्यावर चर्चा करणारा हा सामान्य माणूस वेळेवर कसा क्रांतिकारी होतो, याची झलक त्याने आणीबाणीनंतरच्या निवडणुकांमध्ये जशी दिली, तशी या देशात तीन वेळा डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या पुरोगामी राजकीय पक्षांना सत्ता देऊन त्यांनी आपली सुज्ञता दाखवली. परंतु, समाजवादी आणि डाव्यांच्या झोळ्याच दुबळ्या आहेत. त्यांना तीन टर्म सत्तेवर बसवूनही   सत्ताकाळ पूर्ण करता आला नाही, ही त्यांची अक्षम्यता भारतीय जनमानसाला वेथित करणारी ठरली.  त्यामुळे ‘अच्छे दिन’ च्या लालसेने भारतीय समाज हा राजकीय परिवर्तनासाठी बाध्य झाला. आता दहा वर्षाच्या या सत्तेच्या कार्यकाळात भारतीय माणूस नेमका काय विचार करतो आहे, याची झलक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही; हेच आजच्या तमाम राजकीय परिस्थितीवर उत्तर ठरेल. परंतु, हे पाहण्यासाठी भारतीय समाजाला आणि व्यवस्थेला अजून तीन महिने धीर धरावा लागेल, एवढेच.

COMMENTS