Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिएतनामची महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; विनग्रुपच्या प्रकल्पामुळे शहरी विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : शाश्‍वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉ

फडणवीस सरकारकडून कुंभार समाजाचे आर्थिक हितरक्षण!
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांच्या दोन भव्य प्रकल्पांची घोषणा!
‘समता’चा ११२८ कोटी ठेवींचा टप्पा पारवार्षिक सभेत सर्व ठराव मंजूर; १५ टक्के लाभांश थेट खात्यावर जमा

मुंबई : शाश्‍वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्‍वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्‍वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्‍वासन देत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकार्‍यांसोबत तसेच थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून राज्य प्रशासन कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिप, इलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्स, सामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार मोठ्या प्रमाणावर स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक टाउनशिप विकसित केली जाणार असून सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. व्ही ग्रीन मार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 170 एकर क्षेत्राचा वापर होणार आहे. याशिवाय 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर दिला जाणार असून त्यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन आवश्यक राहणार आहे. पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील पर्यटनवृद्धीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

COMMENTS