वॉशिंग्टन : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांना आता वेग आला असून, अमेरिका आणि इरा

वॉशिंग्टन : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांना आता वेग आला असून, अमेरिका आणि इराणमधील शांतता करार अंतिम टप्प्यात आहे. केवळ इराणकडे असलेल्या युरेनियम साठ्यावर अजूनही सहमती होताना दिसून येत नाही. मात्र होर्मुज सामुद्रधुनी आणि युद्धविराम या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात सकारात्मकता दिसून येत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात विविध माध्यमातून चर्चा सुरू आहे. इराण आणि पाकिस्तानकडून अमेरिकेला नवा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळत असून, त्यात पश्चिम आशियातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी अलीकडेच चर्चेत प्रगती होत असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कराराच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे म्हटले. त्यांनी होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावरही सकारात्मक संकेत दिले.
होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. इराणने फेब्रुवारी अखेरिस या मार्गावर निर्बंध आणल्यानंतर जागतिक खनिज तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. आता प्रस्तावित तडजोडीनुसार ही सामुद्रधुनी मर्यादित अटींसह पुन्हा सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. काही वृत्तांनुसार, ६० दिवसांच्या कालावधीत कोणताही अतिरिक्त कर न आकारता जहाजांना मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. तसेच सामुद्रधुनी परिसरात पेरण्यात आलेले बारुदी सापळे हटवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यांना इराणकडून पूर्ण पाठिंबा मिळालेला नाही. इराणच्या निम-शासकीय वृत्तसंस्थांनी अमेरिकेच्या काही दाव्यांना विरोध दर्शवला आहे. तेहरानकडून स्पष्ट करण्यात आले की, होर्मुज सामुद्रधुनीवरील नियंत्रण इराणकडेच राहणार असून, केवळ जहाज वाहतुकीची पातळी युद्धपूर्व स्थितीत आणण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. प्रस्तावित शांतता आराखडा तीन टप्प्यांत राबवण्याचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम आशियातील संघर्ष औपचारिकरीत्या थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात होर्मुज सामुद्रधुनी प्रश्नावर तोडगा काढला जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात व्यापक राजनैतिक आणि अणुकरारासाठी ३० दिवसांच्या चर्चेची प्रक्रिया सुरू केली जाईल. इराणने या बदल्यात अमेरिकेकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात इराणी बंदरांवरील निर्बंध हटवणे, तेल विक्रीवरील आर्थिक मर्यादा शिथिल करणे आणि परदेशातील इराणी निधीवरील जप्ती उठवणे यांचा समावेश आहे.
इराणचा युरेनियमचा त्याग करण्यास नकार समृद्ध युरेनियमच्या मुद्द्यावरही दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम आहेत. काही अहवालांमध्ये इराणने आपल्या उच्च संवर्धित युरेनियम साठ्याचा त्याग करण्यास तयारी दर्शवल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, इराणने हे वृत्त फेटाळून लावत आपण कोणताही युरेनियम साठा अमेरिकेकडे हस्तांतरित करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या प्राथमिक तडजोडीमध्ये अणु कार्यक्रमाचा समावेश नाही. युरेनियम साठा, अणुकार्यक्रम आणि त्यासंबंधी निर्बंध यावर पुढील टप्प्यात स्वतंत्र चर्चा होणार आहे.

COMMENTS