Homeताज्या बातम्या

अमेरिका-इराणचे युद्ध सलग तेराव्या दिवशीही सुरूच

वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या सैन्याने

ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची घसरण
अमेरिका-इराणची पुढील चर्चा जिनिव्हात होण्याची शक्यता
अमेरिकन कॅबिनेट ही धोक्याच्या घेऱ्यात !


वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या सैन्याने गुरुवारी सलग तेराव्या रात्री इराणमधील विविध ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी, येमेनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या दोन तेलवाहू जहाजांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे पश्‍चिम आशियातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनली असून संघर्षाचा व्याप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरही दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट प्रकारच्या कच्च्या तेलाच्या दराने प्रति पिंप शंभर डॉलरचा टप्पा ओलांडला असून, ऊर्जा पुरवठा आणि जागतिक व्यापाराबाबत चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, इराणची सागरी मार्गांवरील कारवाईची क्षमता कमी करणे आणि व्यापारी जहाजे तसेच नाविकांची सुरक्षितता सुनिश्‍चित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सुरळीत राहावी, यासाठी कारवाई सुरू असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकन हल्ल्यानंतर इराणच्या सरकारी माध्यमांनी बंदर अब्बास, केश्म बेट तसेच अँडिमेश्क आणि ओमिदियेह परिसरात स्फोट झाल्याची माहिती दिली. मात्र, या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हूती बंडखोरांनी आणखी एका महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गात अडथळे निर्माण करण्याचा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर आधीच परिणाम होऊ लागला आहे. जगातील सुमारे वीस टक्के खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक या मार्गाने होत असल्याने अनेक देश पर्यायी समुद्री मार्गांचा शोध घेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जहाजांवरील हल्ले सुरू राहिल्यास हूती बंडखोरांवर कठोर लष्करी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सामाजिक माध्यमावरील संदेशात त्यांनी भविष्यात अशा घटना घडल्यास त्यासाठी थेट इराणला जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट केले.

COMMENTS