बेरकी राजकारणाची तिरकी चाल

Homeताज्या बातम्यासंपादकीय

बेरकी राजकारणाची तिरकी चाल

राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होईल, कोण कुणाला शह देईल, याचा नेम नसतो. त्याचप्रकारे राज्यात झालेले बंड आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि

मंदीचे वारे
कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !
जगणे महागले

राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होईल, कोण कुणाला शह देईल, याचा नेम नसतो. त्याचप्रकारे राज्यात झालेले बंड आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी केलेली घोषणा सारेच काही अनाकलनीय. मात्र यातून अनेक अर्थ ध्वनित होत असून, पुढील राजकारणाचे संकेत प्राप्त होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत एकप्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळयात टाकून, मला देखील सत्तेचा मोह नसल्याचे दाखवून दिले. शिवाय सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवण्यात देवेंद्र यशस्वी झाली आहेत. सत्तेच्या या खेळात कोण कधी यशस्वी होईल, हे सांगता येत नसले तरी, अनुकूल वातावरण बघून निर्णय घ्यावे लागतात, याची चुणूक देवेंद्र यांनी आपल्या या निर्णयातून दाखवून दिली आहे.
देवेंद्र यांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या घोषणेची अनेकांनी खिल्ली उडवली होती. ही लोकशाही असून, या लोकशाहीत, अशाप्रकारच्या घोषणा करणे म्हणजे मतदारांचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याचे वक्तव्य अनेक जाणकारांनी केले होते. मात्र यातून त्यांनी धडा घेत आपले प्रतिमा पुन्हा यशस्वी करून दाखवली आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर भाजपच्या एकाही नेत्याने पुढे येऊन जाहीर वक्तव्य केले नव्हते. किंवा आमचे सरकार येणार, असे कोणतेही वक्तव्य करणे भाजपने मुद्दामहून टाळले होते. या संपूर्ण प्रकियेत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका निर्णायक राहिली आहे. जर न्यायालयाने बहुमत चाचणी पुढे ढकलली असती, तर उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बहुमताचा कौल घेण्यास मान्यता दिल्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्याप्रती एक सहानूभुतीची लाट राज्यात पहायला मिळाली. इतका संयमी, संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नसल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण राज्यात उमटल्या. मात्र या सहानूभुतीच्या लाटेवर मात केली ती, देवेंद्र फडणवीस यांनी. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करून, आपल्याला देखील सत्तेचा मोह नाही. शिवाय मी पुन्हा येईन, ही प्रतिमा पुसून काढण्यात देखील ते यशस्वी झाल्याचे पहायला मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेची बीजे विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून रोवण्यात आली. वास्तविक पाहता, एकनाथ शिंदे गट बेंबीच्या देठापासून उद्धव ठाकरे यांना सांगत होता की, सत्तेतून बाहेर पडा. ही अनैसर्गिक युती तोडा. मात्र संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये फाटेल असे बेताल वक्तव्य केल्यामुळे ही युती जोडण्यापेक्षा अधिकच तुटतच गेली. त्यामुळे बंडखोर गटाने राऊतांना केलले टार्गेट एका अर्थाने योग्यच दिसून येते. राजकारणात कोण कधी कुणालाच अस्पृश्य नसतो. मात्र राऊत यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यात जितकी जास्त कटूता निर्माण होईल, आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीशी जितकी जास्त जवळीक साधता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न केले. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून असलेली भाजप-शिवसेना युती कायमची तुटली गेली आहे. शिवाय शिवसेनेतून 39 आमदार बाहेर पडल्यामुळे शिवसेनेचे प्रचंड मोठे नुकसान यानिमित्ताने होणार आहे. पक्षाची बांधणी, संघटन याची बांधणी करण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. या आव्हानाला उद्धव ठाकरे कसे पेलतील, ते भविष्यात स्पष्ट होईलच. मात्र आतातरी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटले पाहिजे. फक्त संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर यांच्यावर विसंबून राहण्याचे उद्धव ठाकरे आतातरी सोडतील अशी अपेक्षा बाळगूया.

COMMENTS