Homeताज्या बातम्यासंपादकीय

दहशतवादाच्या घटना चिंताजनक

गेल्या काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर खोर्‍यात तीन अधिकार्‍यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. हा आकडा सातत्याने वाढ

क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण
राजकारणाचा खरा चेहरा
एकीकडे दिलासा दुसरीकडे टांगती तलवार

गेल्या काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर खोर्‍यात तीन अधिकार्‍यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. हा आकडा सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि त्याला पाकिस्तानकडून मिळणारे पाठबळ यामुळे दहशतवाद  फोफावतांना दिसून येत आहे. 8-15 दिवसांमध्ये सातत्याने सीमेपलीकडून दहशतवादी भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करून तेथील जनजीवन विस्कळीत करतांना दिसून येत आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांच्या घटनांना आवर घालणे गरजेचे बनतांना दिसून येत आहे. मात्र दहशतवादाविरोधात लढण्याच्या मुद्द्यावर जागतिक पातळीवर अद्यापही स्पष्टता नाही. संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदही यास अपवाद नाही. या निर्णायकीमुळे भारताला आर्थिक आणि मनुष्यहानीच्या स्वरूपात मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. शांततेच्या मार्गावर वाटचाल करण्यात भारत देश नेहमीच अग्रक्रम देत आला आहे. मात्र दहशतवाद्यांकडून भारताला नेहमीच अशांत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी बॉम्बस्फोट करणे, सैन्यावर हल्ले करणे, काश्मीर खोर्‍यात विविध संस्था, संघटनांना टार्गेट करणे, तरूणांची माथी भडकावणे यासारखे कृत्य या दहशतवाद्यांकडून करण्यात येतात. परिणामी भारत नेहमीच या दहशतवादी कारवायांना बळी पडत चालला आहे. आजही काश्मीर सारख्या प्रदेशात जवळपास दर आठवड्याला भारतीय जवान दहशतवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडत आहेत. ही जीवितहानी शांततामय व सौहार्दपूर्ण जागतिक व्यवस्थेसाठी काम करत असल्याचा दावा करणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्था, संयुक्त राष्ट्रसंघ आणि युनोच्या सुरक्षा परिषदेच्या मूलभूत अपयशाची सातत्याने आठवण करून देत आहे. पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करूनही, पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहिले आहे. दहशतवादामुळे पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीत निघाला आहे, तरीदेखील पाकिस्तान त्यातून धडा घेतांना दिसून येत नाही. पाकिस्तान गेल्या काही दशकांपासून जम्मू-काश्मिर खोर्‍यात सातत्याने चकमक घडवून आणत असल्याचे समोर येत आहे. 1980 च्या दशकापासून भारत सातत्याने जागतिक पातळीवर दहशतवाद रोखण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मात्र भारताचा हा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहचत नव्हता. कारण या दहशतवादाची तीव्रता तितक्या मोठ्या प्रमाणावर नव्हती. मात्र अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर, संपूर्ण जगाला दहशतवाद किती भयावह असून, त्याचा निपटारा किती गरजेचा आहे, याचे महत्व पटू लागले आहे. त्यामुळे दहशतवादावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होवूू लागले आहे. मात्र ते अपुरे पडतांना दिसून येत आहे. अमेरिकेने आपल्या देशाकडे वाकडी नजर करणार्‍यांच्या देशात घुसून या कारवायांचा नायनाट केला आहे. मात्र भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान नेहमीच आपली शेपूट वाकडी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी झाल्यास चीन त्यांच्या मदतीला धावून येतो, त्यामुळे पाकिस्तान पुन्हा दहशतवादाला गोंजारतांना दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद, तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी), बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटना वाढत आहेत. त्यामुळे या दहशतवादी संघटनांवर बंदी घालणे, त्यांच्या मोरक्यांना ताब्यात घेणे, त्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच पाकिस्तान विकासामध्ये देखील झेप घेवू शकेल.  दहशतवाद हा निःसंशयपणे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका आहे, परंतु, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा हा दहशतवादापेक्षाही अधिक धोकादायक आहे, कारण दहशतवादाचे ’माध्यम आणि पद्धती’ हे या पैशाच्या जोरावरच पोसले जातात. त्यामुळे खर्‍या अर्थाने पाकिस्तानची रसद तोडण्याची गरज आहे. तरच दहशतवादाला मोडीत काढता येईल, कारण पाकिस्तानच आपल्या देशात दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानने कडक पावले उचलण्यासाठी पाकिस्तानची कोंडी करणेच सर्वात मोठी उपाययोजना ठरणार आहे.

COMMENTS