बीड : ज्या वस्तीत कधी दिवा लागत नव्हता, सावलीचाही विटाळ मानला जात होता, जिथे माणूस असूनही माणसाला माणसासारखे जगू दिले जात नव्हते-अशा अंधकारमय परि

बीड :
ज्या वस्तीत कधी दिवा लागत नव्हता, सावलीचाही विटाळ मानला जात होता, जिथे माणूस असूनही माणसाला माणसासारखे जगू दिले जात नव्हते-अशा अंधकारमय परिस्थितीत प्रज्ञासूर्याचा जन्म झाला. त्या महान व्यक्तिमत्त्वाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची बीजे रोवून समाजाला नवा प्रकाश दिला. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचा भक्कम पाया आहेत, असे प्रभावी प्रतिपादन ‘जग बदलणारा बाप माणूस’ या पुस्तकाचे लेखक प्रा. जगदिश ओहोळ यांनी केले.
बीड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 9) आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांच्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेरणेची नवी चेतना निर्माण झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे उपयुक्त उमेश सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक संचालक दत्तात्रय क्षीरसागर, उपयुक्त (कौशल्य विभाग) समाधान किरवले, गोविंद कदम, अंकुश निर्मळ, अमरसिंह ढाका यांची उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात प्रा. ओहोळ यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा जागतिक प्रभाव अधोरेखित करताना सांगितले की, जगाच्या ज्ञानवेशीवर मानल्या जाणार्या कोलंबिया विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारलेला आहे, ही त्यांच्या विचारांची जागतिक दखल असल्याची साक्ष आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक महादेव इनकर, प्रा.संजय सावते यांनी केले. तर आभार प्रणित सरवदे यांनी मानले. ही व्याख्यानमाला केवळ कार्यक्रम न राहता, सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा विचारांचा जागर ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर यांनी मोलाचे योगदान दिले.
————-

COMMENTS