Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय घडामोडींना वेग

राज्यात सध्या सत्ता-संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असला तरी, हा निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात

राजस्थानातील खांदेपालट
सोशल, सोसेल का?
एका नव्या युद्धाची नांदी

राज्यात सध्या सत्ता-संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असला तरी, हा निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापतांना दिसून येत आहे. राज्यात काही केल्या सत्ता सोडायची नाही, असा होरा भाजपचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने लागला तर चांगलेच आणि विरोधात गेला, तर त्याची पूर्वतयारी भाजपने आधीपासूनच तयारीत केल्याचे एकंदरित दिसून येत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील आमदार आपल्या संपर्कात असल्याची टिप्पणी केली होती. त्यामुळे या सर्व पार्श्‍वभूमीवर चर्चांनी वेग घेतला आहे.

राज्यातील सत्ता-संघर्षावर सध्या सर्वच क्षेत्राकडून चोहोबाजूंने टीका टिप्पणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेसारखाच खेळ राष्ट्रवादीसोबत खेळला जात असल्याचे सांगून बरेच काही सांगून टाकले. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्यांच्या चर्चांनी जोर धरला आहे. तर दुसरीकडे राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांचे नाव आरोपपत्रात नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचा दुसरा अंक रंगण्यापूर्वीची तर ही पार्श्‍वभूमी नव्हे ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून बघितले तर, अजित पवार भाजपविरोधात जास्त प्रमाणात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले नाही. खरंतर सरकारला घेरण्याची आयती संधी असतांना, विरोधकांनी ती आयती घालवली, त्यामुळे काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील अनेक आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त करत, अजित पवार आक्रमक होत नसल्याची टिप्पणी केली होती. मात्र अजित पवारांच्या बाबीं. मोठ्या पवार साहेबांच्या नजरेतून सुटत नसतील असे नाही. तसेच महाविकास आघाडीचे आगामी भवितव्य काय, यावर तर्क-वितर्क सुरू असले तरी, तिन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. शिवाय राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि 16 किंवा 16 आमदारांचे आमदारकी रद्द झाल्यास भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी काही आमदारांची गरज पडणार आहे. अशावेळी भाजपचा डोळा काँगे्रसमधील अशोक चव्हाण, विश्‍वजीत कदम या आमदारांवर आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार काही आमदारांसह पुन्हा भाजपशी संधान बांधतील अशी अपेक्षा भाजपमधील नेत्यांना असल्यामुळे पडद्याआडून अनेक हालचाली सध्या जोमात सुरू आहे. सत्ता-सघर्षांचा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात जावो अन्यथा बाजूने, मात्र आगामी विधानसभा निवडणूका कशा लढायच्या असा भाजपसमोर मोठा पेच आहे. भाजपला राज्यात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी किमान एका सक्षम मित्रपक्षाची गरज आहे. जर अशावेळी शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर, पुढे काय असा प्रश्‍न उरतोच. त्याचबरोबर निवडणुका झाल्यास शिंदे गटाचे 40 आमदार पुन्हा निवडून येतील का, हा महत्वाचा मुद्दा भाजपसमोर उरतोच. त्यामुळे आगामी निवडणूका कशा लढायचा, आणि जिंकायच्या हा भाजपसमोर महत्वाचा प्रश्‍न आहे. अशावेळी भाजप इतर पक्षांतील मातब्बर नेते आपल्यासोबत घेवू शकतो. अजित पवार जर भाजपसोबत आले तर,त्यांची एकहाती आमदार निवडून आणण्याची हातोटी आहे. शिवाय त्यांना माननारे आमदार आहेत. त्यामुळे अजित पवारांसारखा चेहरा भाजपला हवा आहे. मात्र अजित पवार भाजपमध्ये जातील की नाही, ते आगामी काळच ठरवेल. तर दुसरीकडे काँगे्रसमधील नेते अशोक चव्हाण यांचे बंड होता-होता राहिले. त्यामुळे आगामी काळात त्या बंडाला पुन्हा एकदा फूस मिळेल का, सांगता येत नाही.  त्यामुळे  सत्ता संघर्षाचा निकाल जसा जवळ येईल, तशा राज्यात मोठ्या घडामोडींना वेग येईल, यात शंका नाही. त्यामुळे विरोधातील अनेक नेते जर तुरूंगात गेले तर, नवल वाटायला नको. 

COMMENTS