Homeताज्या बातम्यासंपादकीय

शर्मिष्ठांचा नेम की गेम !

 हल्ली लेखन करण्याची कला राजकीय अजेंडे निर्माण करण्याची पध्दत म्हणून, पुढे येत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात नुकतंच एका महिला माजी पोलिस अधिकाऱ्या

चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
गुजरातेत सत्ता विक्रमाच्या बरोबरीची संधी ! 
लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र ! 

 हल्ली लेखन करण्याची कला राजकीय अजेंडे निर्माण करण्याची पध्दत म्हणून, पुढे येत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात नुकतंच एका महिला माजी पोलिस अधिकाऱ्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्यावर राजकीय वाद मोठ्या प्रमाणात झाले. आता देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा यांनी लिहिलेल्या पुस्तकात काही विधाने केली आहेत; जी आता स्फोटक म्हणून बाहेर पडताहेत. अर्थात, ती अशावेळ-काळात बाहेर येत आहेत की, जेव्हा, त्या विधानांचा अर्थ संघ परिवाराच्या भूमिकेशी सुसंगत असणाऱ्या बाबींशी निगडित असावी असं दिसत. खरे तर प्रणव मुखर्जी हे प्रतिभावंत राजकारणी म्हणून कधीही चमकले नाही. खासकरून पश्चिम बंगालच्या राजकारणात डाव्यांचे आव्हान पेलण्यासाठी आणि त्यात काँग्रेस पासून फटकून निघालेल्या ममता बॅनर्जी यांनाही नियंत्रित करता यावे यासाठी, प्रणव मुखर्जी यांच्या राजकारणात  उपयोग करून घेण्यात आला. अर्थात, प्रणव मुखर्जी एवढ्या मोठ्या पदावर गेल्या नंतरही त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कोणताही मतदारसंघ बांधलेला नव्हता. पूर्णपणे काँग्रेसच्या ताकदीवर ते विसंबून होते. पश्चिम बंगालच्या राजकारणाचे वैशिष्ट्य असे की,  राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या किंवा मतदार संख्या ही खास करून दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम मतदारांची आहे. परंतु, या राज्याचे वैशिष्ट्य असे की, या राज्यातील सर्वच पक्षांचे नेतृत्व हे ब्राह्मण जातीकडून करण्यात येते. मग तो कम्युनिस्टांचा पक्ष असो, तृणमूल काँग्रेस असो अथवा काँग्रेस! या सगळ्यांच्या नेतृत्वाला वरच्या जातींची जोड असल्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण दलित, मुस्लिम, ओबीसी संख्या बहुल असताना ते बहुजन हिताचे कधीही राहिले नाही. पण, त्यातच प्रणव मुखर्जी यांना काँग्रेस पक्षाने काहीही म्हटले तरी देशाच्या सत्तेत अतिशय मध्यवर्ती असं ठेवून, संरक्षण असो, गृहखाते असो अर्थ खात असो, ही देशाच्या पोर्टफोलिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असणारी खाती, प्रणव मुखर्जी यांच्याकडे देण्यात आली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचाही कारभार  काही वर्ष सांभाळला. अखेर तर, त्यांनी देशाचं राष्ट्रपती पदही भूषविले. ही सगळी पद त्यांना काँग्रेस मुळेच मिळाली. परंतु, शर्मिष्ठा यांच्या पुस्तकातील आरोप असा की प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदापासून काँग्रेसने दूर ठेवले. मुळात पंतप्रधानपद हे देशाचे असं पद आहे की, या पदावर बसणाऱ्या व्यक्तिला देशाच्या एकूणच  पोर्टफोलिओबरोबर संसदेतील सदस्यांना आणि विविध पक्षाच्या नेत्यांना सांभाळण्याचे कौशल्य देखील या नेत्याकडे लागते. प्रणव मुखर्जी यांच्याकडे हे कौशल्य नव्हते. कारण, दिल्लीत नेता संसदीय पक्षाचा किंवा पंतप्रधान पदाचा तोच व्यक्ती होऊ शकतो, ज्याच्याकडे देशाला पुढे घेऊन जाण्याची ध्येय दृष्टी असण्याबरोबर अनेक नेत्यांना सांभाळण्याचा मुत्सद्दीपणाही आहे. परंतु, आता अशावेळी शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहून वाद उभा केला आहे, ज्यावेळी देशातील परिस्थिती अतिशय वळणाच्या टोकावर आलेली आहे. देशातील राजकीय पक्ष आणि वर्तमान सत्ताधारी यांच्या दरम्यान एक उभी रेष निर्माण होऊ पाहते आहे. असं वातावरण असताना शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहिणे म्हणजे, त्यांच्या प्रतिभेची झेप आहे की त्यांचं यामध्ये राजकीय उद्दिष्ट आहे, हे मात्र स्पष्ट होत नाही. राहुल गांधी यांच्या विषयी विधान करणे किंवा त्यांना नआसमझ समजणं ही बाब निश्चितपणे कुठल्यातरी अनितीमान उद्दिष्टांकडे बोट दर्शवते! कारण, देशाच्या राजकीय पक्षांमध्ये नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, शत्रुत्व नाही! राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी आमचेही मतभेद असू शकतात. परंतु, मतभेद असणं म्हणजे एखाद्याला विकृत ठरवणं किंवा त्याची निंदा करणे नव्हे. विनोदी शैलीतून बदनाम करणं, असा जो हातखंडा गेल्या काही वर्षापासून राबविला जात आहे, त्याच षडयंत्राच्या शर्मिष्ठा या शिकार झालेल्या दिसतात. त्यामुळे प्रतिभा ही नेहमी निरपेक्ष, तटस्थ असावी. प्रतिभेतून प्रतिभेचेच दर्शन व्हावे. त्यामागून डावपेच किंवा षडयंत्र यांचा लवलेश असू नये. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला, विचार करणाऱ्या वाचकाला असं वाटल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या वाचकाला एखाद्या वाक्यातून स्फटकतेपर्यंत नेण्याचा जो अश्लाग्य प्रयत्न लेखक मंडळी सध्या करताना दिसतात, तो एक कॉर्पोरेट पायंडा होऊ पाहतो आहे आणि हा पायंडा देशाच्या बौद्धिक संस्कृतीच्या प्रगतीसाठी आरोग्यदायी नाही.

COMMENTS