मुदखेड शहरातील नागरिकांना भेडसावणार्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला आह

मुदखेड शहरातील नागरिकांना भेडसावणार्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला आहे. शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेला प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. शहरातील विकासकामांमध्ये होत असलेला विलंब आणि नागरिकांची वाढती गैरसोय याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना अद्यापही पहिला किंवा पुढील हप्ता मिळालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अनेकांनी कर्ज काढून किंवा स्वतःच्या आर्थिक मर्यादेत घरांचे बांधकाम सुरू केले असले तरी शासनाकडून मिळणारा निधी रखडल्याने कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना तातडीने थकीत हप्ते वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे अनेक रस्ते खोदण्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतरही खड्डे कायम असल्याने नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याने सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करून वाहतुकीस सुरक्षित करावेत, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय गवळी समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेता तो तातडीने विकसित करावा तसेच स्मशानभूमीत पिण्याचे पाणी, वीज, अंतर्गत रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी नागरिकांना होणारी गैरसोय दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हे प्रश्न केवळ कागदोपत्री न ठेवता तातडीने मार्गी लावावेत. अन्यथा शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव गिरीश कोत्तावार, गटनेते प्रतिनिधी मुजीब पठाण, नगरसेवक खदीरभाई, नगरसेवक अविनाश चौदंते, नगरसेवक प्रतिनिधी संजय बोकेफोड, राजू चौदंते, गंगाधर डांगे, गंगाधर मगरे, सुभाष चौदंते, शिवानंद देवके, वेदांत शेवटे, रमेश बोडके, अनिसभाई, गजानन संबोड, बालाजी गुळेवाड, विठ्ठल आचार्य, राजरत्न क्षीरसागर यांच्यासह शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS