Homeताज्या बातम्यासंपादकीय

दिल्ली पोलिसांची दमनशाही

गेल्या 12 दिवसांपासून देशातील नामांकित कुस्तीपटू आंदोलन करतांना दिसून येत आहे. त्यांची मागणी आहे की, भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपच

अन्यायाचा इव्हेंट किती दिवस ?
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडली
झोपाळू सरकारचा ’ओव्हरटाईम’

गेल्या 12 दिवसांपासून देशातील नामांकित कुस्तीपटू आंदोलन करतांना दिसून येत आहे. त्यांची मागणी आहे की, भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर सात कुस्तीपटू महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, त्यांच्यावर कारवाई करत, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतांना, दिल्ली पोलिस मात्र कुस्तीपटूंचे आंदोलन आपल्या बळाच्या जोरावर मोडून काढण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. बुधवारी रात्री दिल्ली पोलिस आणि कुस्तीपटू यांच्यात जोरदार राडा झाल्याचे दिसून येत आहे. यात अनेक कुस्तीपटूंना दुखापत झाली आहे. मात्र सदर राडा कशामुळे झाला, हे समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पाऊस सुरू असल्याने या कुस्तीपटूंनी झोपण्यासाठी लाकडी बेड आणले होते. जे बेड सहजरित्या फोल्डदेखील केल्या जातात. या बेडवर पोलिसांनी आक्षेप घेतला आणि खेळाडूंबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली.

जर खेळाडू शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत असतील, तर त्यात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही. मात्र सदर आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी दमनशाहीचा वापर करण्यास सुरूवात केली असून, त्याचा प्रत्यय येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनानंतर त्या खेळाडूंची भेट घेण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा भेट घेण्यासाठी जात असतांना, पोलिसांनी त्यांना अडवले. नुसते अडवले नाही, तर त्यांना धक्काबुक्की करत, त्यांना गाडीत कोंबून पोलिस स्टेशनला नेण्यात आले. वास्तविक पाहता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा या एका संवैधानिक पदावर कार्यरत आहेत. त्या काही खेळाडू नाही, किंवा कोणत्या खेळाडूंच्या नातेवाईक नाहीत, किंवा कोणत्याही राजकीय पक्षासी संबंधित नाही. असे असतांना त्यांच्यासोबत दिल्ली पोलिसांनी जे वर्तन केले, ते निषेधार्य असून, याची दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेण्याची गरज आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या ट्विटरवर देखील उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्यासाठी कोण आदेश देत आहे, यासाठी दिल्ली पोलिसांची एका उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता, खेळाडू आंदोलन करत आहे, ते कशासाठी ते देखील समजून घेण्याची गरज आहे. एका अल्पवयीन मुलीसह 7 महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. तेव्हापासून ते बृजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून आरोपीला अटक करण्याऐवजी आंदोलकांना धमकावले जात आहे. ज्या खेळाडूंनी भारताची मान उंचावली, ज्यांना देशाला ऑलिम्पिकसह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धात पदके मिळवून दिली, त्या खेळाडूंना दिल्ली पोलिस अशी वागणूक देत असेल तर, यामागे मोठे षडयंत्र दिसून येत आहे. ज्या बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्यांची चौकशी करण्याचे धाडस ना दिल्ली पोलिस दाखवत आहेत ना, केंद्र सरकार. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी तथ्य असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ज्येष्ठ न्यायमूर्तीमार्फत व्हायला हवी आहे. देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून खेळाडू महिलांसोबत होणार्‍या दुर्वतानाच्या, लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्राप्त होवून देखील त्या दाबल्या जात आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील ही घाणा, विकृतीला लगाम घालण्याची खरी गरज आहे.

COMMENTS