Homeताज्या बातम्यादेश

सर्वोच्च संधी देण्याची ताकद लोकशाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ः जुनं संसद भवन नव्या पिढीला प्रेरणा देत राहील

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसद ही सर्वसामान्यांच्या आशा-आकाक्षंचे प्रतिबिंब आहे. संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवतांनाचा क्षण माझ्यासाठी सर्वात भावनिक होत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक
प्रधानमंत्री मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त कोण-कोणते कार्यक्रम होणार?
पंतप्रधानांच्या हस्ते 71 हजार नियुक्ती पत्रांचे वितरण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसद ही सर्वसामान्यांच्या आशा-आकाक्षंचे प्रतिबिंब आहे. संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवतांनाचा क्षण माझ्यासाठी सर्वात भावनिक होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उदरनिर्वाह करणारा माणूस संसदेत पोहोचेल,  एक दिवस संपूर्ण देश माझ्यावर इतके प्रेम करेल असे मला कधीच वाटले नव्हते, मात्र सर्वसामान्य माणसाला सर्वोच्च संधी आणि पदावर बसवण्याची ताकद लोकशाहीमध्ये असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करतांना ते बोलत होते.

काल सोमवारी जुन्या संसद भवनाला निरोप देत आज मंगळवारपासून नव्या संसद भवनात कामकाजाला सुरूवात होणार आहे. यावेळी सभागृहाला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जुन्या संसदेला स्मरण करताना आणि नव्या भवनात जाण्यापूर्वी इतिहासाच्या त्या प्रेरक महत्वपूर्ण क्षणांना स्मरण करुन आपण पुढे जात आहोत. या ऐतिहासिक भवनाला निरोप देत असतांना, जुने संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिल.आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेत आहे. आज जुन्या भवनात शेवटचा दिवस आहे. असे म्हणत आजचा दिवस भावनिक क्षण असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. जुने घर सोडून नवीन घरात जातो तेव्हा जुन्या आठवणी जाग्या होतात, तशीच आजची भावना असल्याचे सांगत या 75 वर्षांत स्वतंत्र भारताच्या पुनर्रचनेशी संबंधित अनेक घटना या सभागृहातून पार पडल्या, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
यावेळी संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही इमारत उभारण्याचा निर्णय विदेशी खासदारांचा होता. पण आम्ही हे कधीही विसरु शकत नाही आणि गर्वाने सांगू शकतो की या संसद भवनात परिश्रम, घाम माझ्या देशवासियांनी गाळला होता. तसेच पैसे देखील माझ्या देशाच्या लोकांचे होते. या 75 वर्षांच्या आपल्या यात्रेने अनेक लोकशाही परंपरांची टिकवणूक केली. आपण नव्या भवनात भलेही जाऊ पण जुने संसद भवन देखील येणार्‍या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णिम प्रवासाचा भाग आहे. भारताच्या रक्तात लोकशाहीचे सामर्थ्य कसे आहे याची आठवण या भवनापासून होत राहिल. अमृत काळातील पहिली पहाट, राष्ट्राला नवा आत्मविश्‍वास, नवा प्रण, नवे सामर्थ्याने भरणार आहे. चारी बाजूंनी आज भारतीयांची चर्चा होत आहे.

विरोधकांना रडगाणं गायला खूप वेळ – विशेष अधिवेशनाआधी माध्यमांशी संवाद साधतांना पंतप्रधान मोदींनी विरोधकांना चिमटा काढतांना म्हटले आहे की, या अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. मात्र, तो वेळेचा विचार केला तर खूप मोठा आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. अधिकाधिक वेळ कामकाजासाठी मिळावा. रडगाणे गायला खूप वेळ मिळतो. रडगाणे गात राहा, असा उपरोधिक टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा केला गौरव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला संबोधित करतांना, भारताचे सर्वप्रथम पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा विशेष गौरव केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, याच सभागृहातला पंडित नेहरूंचा मध्यरात्रीच्या भाषणाचा आवाज आपल्या सर्वांना प्रेरित करतो. पंडित नेहरूंच्या सुरुवातीच्या मंत्रीमंडळ बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक मंत्री म्हणून होते. तेव्हा जगातल्या सर्वोत्तम गोष्टी भारतात आणण्यावर त्यांचा जोर असायचा. कारखाना कायद्यात आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा समावेश करून घेण्यात आंबेडकर सर्वाधिक आग्रही असायचे. त्याचा आज देशाला लाभ होतोय. आंबेडकरांनी नेहरूंच्या सरकारमध्ये असताना देशाला पाणी धोरण दिले होते. आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारतात सामाजिक न्यायासाठी भारताचे औद्योगिकरण होणे गरजेचे आहे. कारण देशाच्या मागासवर्गाकडे जमिनीच नाही, तर तो काय करेल? असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नेहरू आणि आंबेडकरांचे विशेष कौतुक केले.

COMMENTS