Homeताज्या बातम्यासंपादकीय

राधेश्याम मोपलवावर : कल्पक नव्हे, महाराष्ट्राला कफल्लक करणारा अधिकारी!

काही वर्षांपूर्वी भारतातील एका राजकीय नेत्याने 'चमचा युग' नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे त्यावेळी भारतात खूप गाजलं होतं. हे पुस्तक गाजण्याचा का

युत्या खुशाल कराव्या, पण, विचारांचे भान राखून !
लोकशाहीतील दुबळ्या झोळ्या !
चंद्राबाबू नायडू आणि सभापतीपद!

काही वर्षांपूर्वी भारतातील एका राजकीय नेत्याने ‘चमचा युग’ नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे त्यावेळी भारतात खूप गाजलं होतं. हे पुस्तक गाजण्याचा काळ नव्वदी च्या दशकाचा होता. नेमकं त्याचवेळी महाराष्ट्राच्या प्रशासनात एक नाव फार वेगाने पुढे आले. १९८२ च्या बॅच च्या आय‌आर‌एस मधील ते नाव सुरूवातीपासूनच आय‌एएस च्या कॅडर मधील पोस्टींग घेत राहीलं! १९९५ मध्ये महाराष्ट्रात दिवंगत मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि या नावाला वेगच आला. आय‌आर‌एस वरून ते नाव आ‌य‌एएस कॅडरमध्ये आले आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावर कायापालट करण्याची वल्गना करू लागले. हे नाव दुसरे-तिसरे कोणते नसून काल ज्यांच्या नावाचा थेट उल्लेख करून आमदार रोहीत पवार यांनी महाराष्ट्रात केला ते नाव म्हणजे राधेश्याम मोपलवावर!

    राधेश्याम मोपलवावर नावाच्या या अधिकाऱ्याने महाराष्ट्र शासनाला भुरळ घातली, ती एक कल्पक प्रशासकीय अधिकारी भासवून! हो जाणीवपूर्वक आम्ही हा शब्द वापरतो आहोत. या अधिकाऱ्याकडे कोणतीही कल्पकता नसूनही, एक कल्पक प्रशासक म्हणून सरकारचे लाडके अधिकारी बनून, हजारो कोटींचा मलिदा या अधिकाऱ्याने राज्याच्या जनतेला दोषी ठरवत किंवा भूलथापा देत कमावला. याची दोन उदाहरणे याठिकाणी देतो :- महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे प्रमुख असताना या मोपलवार नावाच्या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील जल प्रदुषणाला राज्याच्या जनतेला दोषी धरले होते. तत्कालीन  महापालिका आयुक्तांसोबत त्यांनी यासंदर्भात अधिकृत सुतोवाच करित म्हटले होते की, महाराष्ट्रातील जल प्रदुषणाला येथील औद्योगिक वा रासायनिक कारखाने जबाबदार नाहीत; तर, महाराष्ट्रातील नागरिक जबाबदार असल्याचा अहवालातून आरोप केला होता. नागरिक त्यांच्या घरात दररोज जो कचरा करतात, त्या कचऱ्याची विल्हेवाट महापालिका प्रशासन नदीत लावत असल्याने राज्यातील पाणी दूषित होत असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले होते. दुसरे म्हणजे समृध्दी महामार्ग निर्मिती, रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक  ठरेल. यामुळे रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण होतील. कारण अनेक उद्योग द्रुतगती मार्गावर येतील, ज्यामुळे आर्थिक-सामाजिक विकासाला चालना मिळेल. २० लाख नोकऱ्या यामुळे निर्माण होतील, अशी कल्पकता त्यांनी मिरवली होती. त्याबरोबरच वायफाय, गेस्ट हाऊस, फूड मॉल्स, पेट्रोल पंप, ट्रक टर्मिनस, बसबे, लँडस्केप, क्विक रिस्पॉन्स टीम, ट्रॉमा सेंटर्स आदी आधुनिक सुविधा महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर उपलब्ध असतील,अशी कल्पकता ही मोपलवार यांनी मिरवली होती. परंतु, प्रत्यक्षात समृध्दी महामार्गाचा प्रकल्प अवघ्या चार महिन्यांत सहा हजार कोटींनी वाढवून त्यातील तीन हजार कोटी मोपलवार यांनी कसे गटवले, हे आमदार रोहीत पवार यांनी महाराष्ट्राला जाहीरपणे सांगितले. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की, मोपलवार हे राज्य सरकारला स्वतःविषयी एक कल्पक किंवा नियोजनकर्ता अधिकारी म्हणून भासवत होते. परंतु, प्रत्यक्षात ते महाराष्ट्राची लुबाडणूक करणारेच अधिकारी निघाले. १९९५ पासून त्यांचं नशीब अधिकच फळफळलं. त्यानंतर १९९९ मध्ये ते युएसए ला नॉलेज मॅनेजमेंट शासकीय खर्चावर करण्यासाठी गेले होते. २००२ मध्ये त्यांनी डेटा स्टोरेज मॅनेजमेंट मध्ये ब्रिटनमधून प्रशिक्षण घेतलं. हे सर्व शासकीय खर्चाने ते करून आले होते. या सगळ्या बाबींचा त्यांनी वापर असा केला की, महाराष्ट्रामध्ये ते अतिशय कल्पक आणि नियोजनकर्ते प्रशासकीय अधिकारी आहेत! प्रत्यक्षात प्रामाणिक नियोजन कर्ता हा कधी ओरबाडणारा अधिकारी बनू शकत नाही. किंबहुना, कल्पनाप्रधान व्यक्ती हा भ्रष्ट आचरणाच्या नादी लागू शकत नाही. कारण, अशा व्यक्तींना निर्मितीचा आनंद असतो. परंतु, यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राने जे पाहिलं ते आमदार रोहित पवार यांच्या शब्दात पहिल्यांदाच समोर आलं. अन्यथा, प्रशासनामध्ये मोपलवार नावाच्या या अधिकाऱ्याला एम एस आर डी सी मधून निवृत्त होऊनही त्या पदावर कायम ठेवण्यात आलं होतं. निवृत्तीच्या काळानंतर ही सात वेळा एक्सटेंशन मिळवणारा हा अधिकारी, राज्य शासनाची फसवणूक करणारा अधिकारी होता का, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिला आहे. कारण, ज्या पद्धतीने आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चित्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभे केले आहे, त्यातून हेच दिसतं की, हा अधिकारी आपल्या चाणाक्षपणातून केवळ सरकारलाच गंडवत होता असं नाही; तर, महाराष्ट्राच्या जनतेलाही भूलथापा या अधिकाऱ्याने दिल्या आणि त्या बळावर या अधिकाऱ्याने अनेक पदांवर आपलं राज्य प्रस्थापित केलं. दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्राच्या जनतेला कायम दोषयुक्त ठरवण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्याने केला. प्रदूषणाला जनता जबाबदार आहे आणि समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे ज्या अनेक सुविधा शेतकरी युवक आणि उत्पादक यांना निर्माण होतील त्यांचा भुलभुलय्या त्यांनी उभा केला. परंतु, प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे, हे आज महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे राधेश्याम मोपलवार हे कल्पक अधिकारी नसून महाराष्ट्राला कफल्लक करणारे अधिकारी आहेत.

COMMENTS