तेहरान : इराणमध्ये वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था आणि चलन संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जनआंदोलनांनी तीव्र स्वरूप धारण केले असून, सुरक

तेहरान : इराणमध्ये वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था आणि चलन संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जनआंदोलनांनी तीव्र स्वरूप धारण केले असून, सुरक्षादलांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. विविध वृत्तसंस्थांच्या अहवालांनुसार, आंदोलनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात किमान 217 आंदोलकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांचा समावेश आहे.
राजधानी तेहरानसह देशातील अनेक शहरांमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरू असताना हिंसाचारात झपाट्याने वाढ झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षादलांनी कठोर पावले उचलल्याचा दावा केला जात आहे. तेहरानमधील काही रुग्णालयांच्या माहितीनुसार, केवळ सहा रुग्णालयांतच 217 मृतांची नोंद झाली असून, बहुतेकांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे. उत्तर तेहरानमधील एका पोलीस ठाण्याजवळ आंदोलन चिघळल्यानंतर सुरक्षादलांकडून स्वयंचलित शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या कारवाईत अनेक आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्थांनी आतापर्यंत तुलनेने कमी मृत्यूंची पुष्टी केली असून, मृतांच्या आकड्याबाबत अद्याप मतभेद कायम आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन इराणमध्ये इंटरनेट व दूरसंचार सेवा मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे माहितीचा प्रवाह मर्यादित झाला असून, नेमकी स्थिती समजणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीच इराण सरकारला इशारा दिला होता. शांततामय आंदोलकांवर गोळीबार झाल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या परिस्थितीत अधिकच चिघळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींविरोधात उसळलेला जनक्षोभ आता राजकीय संघर्षात रूपांतरित होत असून, इराणमधील परिस्थिती कुठल्या दिशेने जाईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
सरकार झुकणार नाही ः खामेनेईची दर्पोक्ती
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी मात्र परकीय दबावाला न जुमानण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेवर टीका करताना त्यांनी, देशांतर्गत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांसमोर सरकार झुकणार नाही, असे ठामपणे सांगितले. त्याचबरोबर, आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे. काही सरकारी माध्यमांतून आंदोलकांना कठोर शिक्षेचा, अगदी मृत्युदंडाचाही, इशारा देण्यात आल्याने देशातील वातावरण अधिकच भयग्रस्त झाले आहे.

COMMENTS