Homeताज्या बातम्यासंपादकीय

संशयाचे राजकीय धुके

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार या दोघांभोवती फिरतांना दिसून येत आहे. अजित पवारांच्या भाजपप्रव

जननायकाचा गौरव
भविष्याचा नवा कर्तव्यपथ
आंदोलन बंदी ही तर, मुस्कटदाबी

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार या दोघांभोवती फिरतांना दिसून येत आहे. अजित पवारांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेचे गुर्‍हाळ अजून काही संपण्याची चिन्हे नाहीत. तर दुसरीकडे शरद पवार यांची अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी भेट घेतल्यामुळे पवारांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता राजकारणी आणि उद्योगपती यांनी भेट घेतली, बंद दाराआड चर्चा केली, तर अशा चर्चांना जास्त महत्व द्यायचे नसते. किंबहून अशा गाठी भेटी खासगी म्हणून दुर्लक्षित केल्या जातात. मात्र या भेटीकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण काँगे्रस नेते राहुल गांधी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय, त्या बोगस कंपन्यामध्ये 20 हजार कोटी रुपयांचे कुणाचे गुंतले आहेत, असा सवाल करत मोदी सरकारला राहुल गांधी चांगलेच घेरतात. दुसरीकडे याप्रकरणी संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी करून सरकारच्या नाकीदम आणत असतांना, शरद पवार जेपीसीऐवजी आमचा सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीवर विश्‍वास असल्याचे सांगत जेपीसीतील हवा काढण्याचा प्रयत्न करतात. याचाच अर्थ शरद पवार राहुल गांधींच्या आंदोलनातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे गौतम अदानी यांना सेफ करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात. त्यातच गौतम अदानी यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीमुळे या चर्चांना बळ मिळतांना दिसून येत आहे.

एकीकडे शरद पवार प्रादेशिक विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत असतांना, दुसरीकडे एकप्रकारे अप्रत्यक्षपणे अदानी यांना पाठीशी घालतांना दिसून येत आहे. त्यामुळे पवारांचे राजकारण नेहमीच संशयाचे राहिले आहे. त्यामुळे पवार विरोधकांना मदत करत आहेत की, विरोधाची धार कमी करत आहेत, यावर चर्चा होण्याची गरज आहे. राज्यातील सत्तांतरामागे उद्योगपतींचा हात असून, त्या एका उद्योगपतीने कोट्यावधी रुपये या सत्तांतरासाठी ओतल्याची मध्यंतरी चर्चा सुरू होती, असे असतांना या सर्व बाबी बघता शरद पवारांचे राजकारण नेहमीच संशयाचे राहिले आहे. एकतर शरद पवार उघडपणे भाजपमध्ये जाण्यास तयार नाहीत, दुसरीकडे त्यांचा भाजपविरोध देखील इतका प्रखर नाही, त्यामुळे पवारांचे राजकारण नेमक्या कोणत्या दिशेला चालले आहे. पवार आपल्या राजकारणात कात्रजचा घाट दाखवण्यात प्रसिद्ध असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर पवार जे बोलतात ते करत नाही, आणि जे बोलत नाही ते करून दाखवतात असे बोलले जाते. त्यामुळे एकीकडे अजित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी अनुकूल असतांना, शरद पवार मात्र भाजपमध्ये जाण्यासाठी अनुत्सूक नाहीत. त्यामुळे पवारांनी त्यांच्या भूमिकेमुळेच त्यांच्यावर संशयाची सुई फिरवली आहे. शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झालेत, मात्र त्यांनी कधीही या प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. आणि आताही या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा नाही. पवारांचा लोभ हा सर्वच पक्षांतील नेत्यांशी आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांमध्ये एक बाब समजून घ्यावी लागेल. अजित पवारांनी बंडाचे वृत्त फेटाळल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे येत अजित पवारांना सावरून घेण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांची बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न बावनकुळे यांनी केला. त्यामुळे बावनकुळे आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाले की काय, असा सवाल आता आमच्या मनात उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण गडद होतांना दिसून येत आहे. संशयाच्या धुके वाढत चालले असल्यामुळे समोरचे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र वातावरण निवळले की, पुढील चित्र स्पष्ट होईल.

COMMENTS