Homeताज्या बातम्यासंपादकीय

जननायकाचा गौरव

भारतासारख्या विशाल देशामध्ये हजारो जाती अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे अनेक धर्म देखील या देशामध्ये वास्तव्यास आहेत. समाजाची विभागणीच ही जातीच्या

खरा न्याय जनतेच्या दरबारातच …
राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांचा प्रश्‍नांचा विसर
सत्ता संघर्षांचा तिढा आणि घटनात्मक पेच

भारतासारख्या विशाल देशामध्ये हजारो जाती अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे अनेक धर्म देखील या देशामध्ये वास्तव्यास आहेत. समाजाची विभागणीच ही जातीच्या आधारावर असल्यामुळे या देशातील हजारो जाती शेकडो वर्ष पीडित राहिल्या. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे महत्वप्रयासाचे काम अनेक महामानवांनी केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांनी सामाजिक न्यायासाठीचा लढा पुकारला. त्यांच्या या लढ्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या कामाची ही खर्‍या अर्थाने पावतीच म्हणावी लागेल. छोट्याशा जातीमध्ये जन्माला येवून देखील बिहारसारख्या राज्यात सामाजिक प्रयोग राबवत ते दोनदा मुख्यमंत्री झाले. खरंतर भारतासारख्या देशामध्ये प्रस्थापित जाती, या छोट्या-वर्गसमूहाला कधीच सत्तेत सहभागी करून घेत नाही. सत्तेत सहभागी करून घेतले तरीही त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. मात्र बिहारसारख्या राज्यात एका छोट्या जातीतील तरूण, ओबीसी समाजातून आलेला हा तरूण दोनवेळेस मुख्यमंत्री होतो ही आश्‍चर्याची गोष्ट वाटत असली तरी, त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घेतलेले कष्ट त्याचेच हे यश म्हणावे लागेल. बिहारमध्ये नुकतीच नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणना करत ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. मात्र त्याची बीजे कर्पूरी ठाकूर यांच्या राजकारणात आढळतात. कर्पूरी ठाकूर 1952 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले. मागासवर्गींयासाठी आरक्षणाची शिफारस मुंगेरीलाल आयोगाने केली होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्यानुसार त्यांनी मागासवर्गींयासाठी 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने त्यांनी प्रतिमा बिहारमध्ये जननायक अशी बनली. त्यांच्यावर जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही. तर त्यांनी नेहमीच सामाजिक उत्थान करण्यासाठी काम केले. कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भत्त्याशिवाय कोणाकडून एक पैसाही जादा घेतला नाही. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखल्या जाणार्‍या कर्पूरी ठाकूर यांच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक रंजक गोष्ट त्याच्या मुलीच्या लग्नाची आहे. कर्पूरी ठाकूर 1970 ते 71 या काळात मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना आपल्या मुलीसाठी मुलगा शोधण्यासाठी रांचीला जावे लागले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत वाहन न वापरता टॅक्सी करून रांचीला गेले.  कर्पूरी ठाकुर यांच्या मुलीचं लग्न अगदी साधेपणाने झालं. त्यांनी त्या लग्नासाठी कोणत्याही नेत्याला किंवा त्यांच्या मित्रांना आमंत्रित केले नाही. इतकं की मुख्यमंत्र्यांसोबत राहणारे सुरक्षा कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनातील कुणीही त्या लग्नासाठी उपस्थित नव्हते. कर्पूरी ठाकूर इतके दिवस आमदार आणि मुख्यमंत्री राहिले पण त्यांना गाडीही घेता आली नाही. बिहारसाख्या राज्यातील बहुसंख्य समाज हा पिचलेला होता. मागासवर्गीय, दलित, हा वर्ग सत्तेपासून दूर होता, तसाच तो सामाजिक प्रवाहापासून कोसो दूर होता. त्या समाजापर्यंत शिक्षणाच्या सोयी-सुविधा आरोग्याच्या सुविधा, यासोबतच मूलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कर्पूरी ठाकूर यांनी नेहमीच योगदान दिले. त्यांच्या या कार्याचाच गौरव करून त्यांना सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. 1952 मध्ये ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत ते 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते. कारण त्यांनी कधीही धनसंचय केला नाही. कारण त्यांची जडणघडण ही जयप्रकाश नारायण, राममनेाहर लोहिया यांच्या विचाराने झाली होती. त्यामुळे धनसंचय करण्याची त्यांना कधी गरज भासली नाही. त्यांच्याजवळ होते-नव्हते, ते सर्व त्यांनी समाजासाठी खर्ची घातले. त्यांचे आयुष्य, पैसा, वेळ सर्व त्यांनी समाजासाठी खर्ची घातले. कर्पूरी ठाकुर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावी यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणांना हात घातला. त्यामुळे बड्या जमीनदारांकडून भूमीहिन दलितांकडे जमिनीचे हस्तांतर झाले.

COMMENTS