Homeताज्या बातम्या

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस अटकेतअमली पदार्थाचे खोटे आरोप करून मागितली होती पाच लाखांची खंडणी

पुणे : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पर्यटकांची मोटार अडवून त्यांच्या ताब्यात अमली पदार्थ असल्याची खोटी भीती दाखवत पाच लाख रुपयांच

मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठकपोलीस निरीक्षक विनोद घोडवे यांचा सत्कार
कुंडलवाडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन
नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 80 गुन्हे दाखल, 1.27 कोटींचा मुद्देमाल जप्त
Mumbai-Pune Expressway Police Extortion | 5 Lakh Demanded on Drugs Scare


पुणे : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पर्यटकांची मोटार अडवून त्यांच्या ताब्यात अमली पदार्थ असल्याची खोटी भीती दाखवत पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महामार्ग पोलिसांच्या मदत केंद्राशी संबंधित तीन पोलीस कर्मचारी आणि दोन वॉर्डन यांना अटक करण्यात आली असून, आणखी एक संशयित अद्याप फरार आहे. या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै 2026 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भूषित उमेश शर्मा हे त्यांच्या तीन मित्रांसह पुण्याहून लोणावळ्याकडे मोटारीने प्रवास करत होते. मावळ तालुक्यातील ताजे गावाच्या हद्दीत अंबर रंगाचा दिवा लावलेल्या एका वाहनाने त्यांची मोटार अडवली. त्यानंतर पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या काही जणांनी स्वतःची ओळख देत वाहनाची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान पर्यटकांच्या मोटारीत अमली पदार्थ असल्याचा खोटा आरोप करण्यात आला. त्यानंतर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची भीती दाखवत प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटक घाबरले. संशयितांनी त्यांना तळेगावच्या दिशेने नेऊन तेथील धनवितरण यंत्रातून पैसे काढण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी संधी साधून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आपला डाव उघड झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर भूषित शर्मा यांनी तातडीने कामशेत पोलीस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान या प्रकरणातील संशयित खंडाळा महामार्ग पोलीस मदत केंद्राशी संबंधित असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पोलीस नाईक (चालक) अमोल वायकर, पोलीस शिपाई अमोल नन्नवरे, पोलीस शिपाई तुषार ढवळे, वॉर्डन किसन बोम्बले आणि नितेश चव्हाण यांना अटक केली. या गुन्ह्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचा संशय असून, वॉर्डन तुषार घाडगे हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित पोलीस कर्मचार्‍यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कामशेत पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अशा प्रकारच्या आणखी घटनांशी या टोळीचा संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

COMMENTS