Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यातील नरबळी प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन घट्ट

ढेबेवाडी / वार्ताहर : गुप्तधनाच्या आमिषाने विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री संतोष माने (वय 17) या महाविद्यालयीन युवतीची गळा चिरून झालेल्

म्हसवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत
इस्लामपूर बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकविणार
विषमुक्त शेतीसह विषमुक्त कृषी उत्पादने काळाची गरज : ना. देवेंद्र फडणवीस

ढेबेवाडी / वार्ताहर : गुप्तधनाच्या आमिषाने विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री संतोष माने (वय 17) या महाविद्यालयीन युवतीची गळा चिरून झालेल्या हत्या प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन दिवसेंदिवस अधिकच घट्ट बनत चालले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विजापूर-कर्नाटक येथील आणखी एका संशयिताला काल रात्री अटक केल्याने संशयितांची संख्या आता पाच झाली आहे. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश असून, पाटण न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्याला हादरवून सोडलेल्या या हत्येचा तब्बल साडेतीन वर्षांनी उलगडा झाला आहे. गुप्तधन प्राप्ती व घराची भरभराट होण्यासाठी मांत्रिकाच्या नादाला लागून आजीच्या पुढाकाराने कु. भाग्यश्री हिचा बळी दिल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गळा चिरणारा मांत्रिक फुलसिंग सेवू राठोड (रा. ऐनापूर तांडा विजापूर, कर्नाटक), मांत्रिकाचा वाहन चालक विकास ऊर्फ विक्रम तोळाराम राठोड (रा. नर्‍हेगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मुळेतांडा, ता. दक्षिण सोलापूर), मुलीची आजी (आईची आई) रंजना लक्ष्मण साळुंखे (रा. तळमावले, ता. पाटण) व स्थानिक देवऋषी कमल आनंदा महापुरे (रा. खळे, ता. पाटण) यांना अटक केली होती. तसेच आणखी एकाचा पोलीस कसून शोध घेत होते. काल रात्री मोहनसिंग सीताराम नाईक (रा. महलतांडा, विजापूर) याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतल्याने अटक केलेल्या संशयितांचा आकडा पाच झाला आहे. यापूर्वी अटक केलेल्या चौघांपैकी दोघांना न्यायालयाने 25 तारखेपर्यंत, तर दोन महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्या दोघींच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांच्यासह नव्याने अटक केलेल्या मोहनसिंग याला आज पाटण न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. अजून किती जणांचा या गुन्ह्यात समावेश आहे. याबद्दल जनतेत उत्सुकता वाढत चालली आहे. या प्रकरणाचा उलगडा करणारे ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष पवार व त्यांच्या टीमवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांकडून अतिशय गुप्तपणे तपास सुरू आहे.

COMMENTS